जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । परीक्षेचा निकाल आणि अभ्यासाच्या तणावातून एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील पिंप्राळा येथील आनंद मित्र सोसायटीत उघडकीस आलीय. तृप्ती रवींद्र साळुंखे असे मृत मुलीचे नाव असून याघटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे घटना?
मृत मुलीचे वडील हे माजी सैनिक आहेत. ते सध्या गुवाहाटी मध्ये डिफेन्स सिक्योरिटी कोरमध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहेत. ते रजेवर घरी आलेले होते. त्यांची रजा संपली असल्याने शुक्रवारी दुपारी त्यांना ड्युटीवर जायचे होते. सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास तुप्ती हिने वडिलांना दुचाकीवर रेल्वे स्थानकावर सोडले. घरी परतल्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास तीने राहत्या घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केली. समोरील खोलीतून धुणीभांडी करुन परतलेल्या आईने मुलीचा गळफास घेतलेला मृतदेह बघून एकच आक्रोश केला. पत्नीकडून मुलीने गळफास घेतल्याची माहिती मिळताच. रवींद्र साळुखे यांनी तत्काळ रेल्वेतून उतरुन घरी धाव घेतली.
तुप्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तिच्या मैत्रिणींनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. तिला बारावीत 78 टक्के गुण मिळाले असल्याचे मैत्रिणींनी वडिलांना सांगितले. अभ्यास, निकालाच्या तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलले असावे, असे रवींद्र साळुंखे यांनी सांगितले. तिच्या पश्चात आईवडील व मोठा भाऊ असा परिवार आहे.