जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२५ । जळगावच्या वातावरणात अचानक बदल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे मागच्या काही दिवसापासून १० अंशाखाली असेलला किमान तापमानात एकाच दिवसात ५ अंशाहुन अधिकची वाढ झाली आहे. शनिवारी पहाटे किमान तापमान ९.१ अंशांवर होते तर रविवारी पहाटे त्यात तब्बल ५.४ अंशांनी वाढ होऊन तापमान १५.५ अंशांवर पोहोचले. परिणामी रविवारी पहाटे थंडीची तीव्रता जाणवली नाही.

जळगाव शहरासह जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात तापमानात चढ-उतार दिसून आले. गेल्या आठवड्याच्या सुरुवातील किमान तापमान १० अंशावर होते. यानंतर नवी वर्षाच्या पहिल्याच दिवशी तापमानात घसरण दिसून आली. १ जानेवारीला जळगावचे शहराचे किमान तापमान ९.२ अंश इतके होते. सलग चार दिवस तापमान स्थिर राहिल्यानंतर काल रविवारी एकाच दिवसात तब्बल ५.४ अंशांनी वाढ होऊन तापमान १५.५ अंशांवर पोहोचले. फक्त किमान तापमानात वाढ झालेली आहे. मात्र कमाल तापमान जवळपास स्थिर आहे.

तापमानात वाढ झाल्यानं काल रविवारी पहाटे थंडीची तीव्रता जाणवली नाही. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय असतानाही हे बदल अचानक घडत आहेत. दक्षिण-पूर्व राजस्थानवर एक चक्रीवादळी प्रणाली सक्रिय झाली आहे. जी महाराष्ट्रात उबदार आणि आर्द्र हवा आणत आहे. हे थंड लाटेचा प्रभाव कमी करते व तापमान वाढवते. ही प्रणाली तीव्र होत असल्याने थंडीची तीव्रता कमी होत आहे. पुढील काही दिवसांत थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे, असे बदल हवामानातील अनियमिततेमुळे होतात.

पुढे काय?
जळगाव जिल्ह्यात ५ ते ९ जानेवारी दरम्यान किमान तापमान ११ ते १५ अंशांच्या दरम्यान राहील. कमाल तापमान २९ ते ३२ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता अधिक आहे. ७ जानेवारीपर्यंत हलकेसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान अभ्यासक याची वर्तविली आहे.



