जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२५ । एकीकडे उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातील तापमानात घट झाल्याने हुडहुडी भरणारी थंडी जाणवत असताना अचानक वातावरणात बदल झाल्याने थंडी गायब झालीय. यामागचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने परिणामी ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली. यामुळे पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाचा उकाडा अशी स्थिती आहे. मात्र हवामान खात्यानं डिसेंबरच्या सुरुवातीलाच गुलाबी थंडी पुन्हा पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

मागच्या काही दिवसापासून कमाल आणि किमान तापमानात चढ उतार सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. जळगावात काही दिवसापूर्वी ८ अंशापर्यंत घसरलेला पारा १७ अंशावर पोहोचला आहे. दिवसाच्या तापमानातही वाढ झाल्यानं थंडी गायब होऊन जळगावकरांना उकाडा जाणवत आहे. दरम्यान हवामान खात्यानं राज्यातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या ‘डिटवाह’ चक्रीवादळामुळे आज राज्यात आकाश ढगाळ असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात घोंगावणारं ‘डिटवाह’ चक्रीवादळ उद्या म्हणजेच ३० नोव्हेंबर रोजी पहाटेपर्यंत उत्तर तमिळनाडू-दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेशात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात रात्रीच्या तापमानात आज आणि उद्या पुन्हा वाढ होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाचे निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी म्हटले आहे.
काल म्हणजेच शुक्रवारी जळगाव शहरात किमान तापमान १७ अंश नोंदले गेले. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. सोबतच कमाल तापमानातही वाढ झाली. काल किमान तापमान ३१ अंशावर होते. दरम्यान, पहाटे आणि सकाळच्या वेळेस थंडी जाणवत आहे. मात्र दुपारच्या वेळेस उन्हाचा उकाडा जाणवत आहे.
दरम्यान राज्यात १ डिसेंबर पासून वातावरण पूर्ववत होऊन गुलाबी थंडी पुन्हा पडणार आहे. पुढील तीन दिवसात २ ते ३ अंश सेल्सियस ने तापमानात घट होणार आहे. त्यामुळे वातावरणात गारवा वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. सतत बदलत असलेल्या वातावरणाने नागरिकांना हैराण केले असून वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागत आहे.







