जळगावकरांना उन्हाच्या झळांनंतर आता असह्य उकाड्याचा त्रास; जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता

मे 25, 2026 9:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२६ । जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत असलेल्या जळगावकरांना आता असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तापमानाचा पारा गेल्या आठवड्याच्या तुलनेत २ ते ३ अंशांनी घसरला असला, तरी वातावरणातील आर्द्रतेचे (हवेतील ओलावा) प्रमाण थेट ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. दरम्यान, रविवारी जिल्ह्यातील यावल, रावेर तालुक्यासह काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

tapman

जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हवामानात मोठा बदल जाणवत आहे. सध्या अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे वाहत असल्यामुळे हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे तापमान ४२ ते ४३ अंशांच्या आसपास असतानाही उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. वातावरणात ४५ टक्क्यांवरील आर्द्रता आणि हवेतील बाष्पामुळे शरीरातील घाम लवकर सुकत नसल्याने जळगावकरांची घालमेल होत आहे. रविवारी हवेतील आर्द्रता व वाऱ्याचा वेग ताशी सुमारे ३० किमी वेगाने वारे वाहत असल्याने पारा ४१.५ अंशांवर घसरला यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

दिवसाचे तापमान काहीसे स्थिर असले तरी शरीरातील उष्णता बाहेर पडत नसल्याने प्रत्यक्ष तापमानापेक्षा जास्त उष्मा जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळी १० वाजता तापमान ४२ अंशांवर पोहोचत होते; मात्र रविवारी सकाळपासूनच शहरात अधूनमधून ढगाळ वातावरण होते. दुपारी १२ नंतर पुन्हा कडक ऊन पडले, तर दुपारी ३:३० वाजेनंतर अचानक हवामान बदलले. रविवारी यावल, रावेर तालुक्यासह काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

दरम्यान, मान्सून दाखल होण्यापूर्वी आगामी काही दिवसांत जिल्ह्यातील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मात्र, वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त राहणार असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावाच लागणार आहे. मान्सून जिल्ह्यात पोहोचण्यासाठी जून महिन्याचा मध्य उजाडण्याची शक्यता आहे. तोपर्यंत केवळ पूर्व मान्सून स्वरूपातील हलके ढग, अधूनमधून गडगडाट आणि काही ठिकाणी तुरळक पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now