जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२६ । जळगाव जिल्हा सध्या उन्हाच्या तीव्र तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहे. सूर्याचा प्रकोप वाढत असतानाच आता हवामान विभागाने जळगावकरांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या उच्च दाब पट्ट्यामुळे तापमानात मोठी वाढ होणार असून, २५ एप्रिल हा दिवस या मोसमातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगावचे तापमान ४० अंशांच्या वरच स्थिरावलेले आहे. गुरुवारी जळगावचा पारा ४२.७ अंशांवर नोंदवला गेला होता. मात्र, हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, उष्णतेची लाट अधिक तीव्र होईल आणि पारा ४४ अंशांचा टप्पा ओलांडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जळगावकर उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळून निघणार आहेत.

केवळ दिवसाच उन्हाचे चटके बसत आहेत असे नाही, तर रात्रीच्या तापमानातही मोठी वाढ झाली आहे. रात्रीचे तापमान २६ ते २९ अंशांच्या दरम्यान राहणार असल्याने सूर्यास्तानंतरही उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. रात्रीच्या वेळीही अंगाची लाहीलाही होणार असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे.
उच्च दाब पट्ट्याचा परिणाम
हवामान तज्ज्ञांच्या मते, जिल्ह्यावर असलेल्या उच्च दाब पट्ट्याच्या प्रभावामुळे उष्ण वारे जमिनीलगतच साठून राहत आहेत. वातावरणात पावसासाठी आवश्यक असलेला ओलावा नसल्याने हवामान पूर्णपणे कोरडे आणि उष्ण झाले आहे. परिणामी, उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढत चालली आहे.वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असून, आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.






