फेब्रुवारीतच जळगाव तापले ; मार्च-एप्रिलमध्ये काय होणार?

फेब्रुवारी 20, 2026 4:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२६ । फेब्रुवारी महिना संपायला अजून काही दिवस बाकी असतानाच जळगाव जिल्ह्यात तापमानाने अचानक उसळी घेतली आहे. दिवसाचे तापमान तब्बल ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून रात्रीचे तापमानही २० अंशांपर्यंत गेले आहे. त्यामुळे हिवाळ्याची चाहूल पूर्णपणे नाहीशी होत उकाड्याची तीव्रता वाढू लागली आहे.

tapman 1 jpg webp

यंदा जळगावात थंडीने अनेक रेकॉर्ड मोडले होते. डिसेंबर आणि जानेवारीच्या सुरुवातीला तापमानात निच्चांकी घसरण झाल्याने जळगाव गारठले होते. फेब्रुवारीतही हुडहुडी भरणारी थंडी जाणवेल, असं वाटत होते. मात्र फेब्रुवारी पंधरवड्यात जळगावातील तापमानात मोठा बदल दिसून आला. तापमानात वाढ होऊ लागल्याने थंडीही कमी झाली.

जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीचे तापमान तब्बल २० अंशापर्यंत तर दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यामुळे सकाळी आणि संध्याकाळी जाणवणारा गारवा आता कमी झाला असून दुपारच्या सुमारास उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. फेब्रुवारी महिन्यातच एवढी तापमानवाढ झाल्याने मार्च-एप्रिलमध्ये उष्णतेची तीव्रता किती वाढेल, याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सध्या ट्रॅप्ड हीट इफेक्टमुळे उष्णतेची तीव्रता वाढली असून ढगाळ आणि धूसर वातावरण असूनही तापमानात वाढ होत आहे. सकाळी थंडावा, कमी सूर्यप्रकाश आणि धुरकट आकाश जाणवत असले तरी दुपारच्या सुमारास कमाल तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे नागरिकांना उकाडा जाणवत आहे.

दरम्यान, पुढील काही दिवसांतही कमाल तापमान हळूहळू वाढत राहील आणि उन्हाळ्याची चाहूल अधिक स्पष्ट होईल. वैद्यकीय तज्ज्ञांनी वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे आणि हलका आहार घ्यावा, असा सल्ला दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now