⁠ 
सोमवार, जानेवारी 13, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | कोरोना नियम मोडाल तर खबरदार; २० हजार नियम मोडणाऱ्यांकडून ६३ लाखाचा दंड वसूल

कोरोना नियम मोडाल तर खबरदार; २० हजार नियम मोडणाऱ्यांकडून ६३ लाखाचा दंड वसूल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कडक निर्बंध लागू केले असून नागरीकांसाठी नियमावलीही जाहिर केली आहे. तथापि, काही नागरीक नियमांचे पालन करीत नसल्याने पोलीस व नगरपालिका प्रशासनाने जिल्ह्यातील अशा 20 हजार 268  व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करुन त्यांचेकडून 63 लाख 6 हजार 400 रुपयांचा दंड वसुल केला आहे. शिवाय 574 व्यक्ती व संस्थावर गुन्हे दाखल करण्यात आले असून 23 प्रतिष्ठाने सील करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नियमावली ठरविली असून मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडी ठेवणे, गर्दी करणे, कोविडच्या उपाययोजना न करणे आदिंसह इतर कारणांसाठी दंडात्मक कारवाईचे निर्देश पोलीस, महानगरपालिका व नगरपालिका प्रशासनास दिल्या आहेत. असे असूनही काही नागरीक व आस्थापना कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याने त्यांचेवर दंडात्मक करावाई करण्यात येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत मास्क न लावणाऱ्या 19 हजार 77 व्यक्तींकडून 53 लाख 83 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 15 व्यक्तींकडून 69 हजार 800 रुपये, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या 561 व्यक्तींकडून 2 लाख 17 हजार 400 रुपये दंड वसूल केला असून 531 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या 241 प्रतिष्ठानांना यामध्ये मंगल कार्यालये, नाट्यगृह, हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह यांना 4 लाख 80 हजार 300 रुपये दंड करुन 43 प्रतिष्ठानांवर गुन्हे दाखल केले आहेत तर 23 प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या सार्वजनिक वाहतुक करणाऱ्या 374 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना 1 लाख 55 हजार 200 रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

दंडात्मक कारवाईत पोलीस प्रशासन आघाडीवर

जिल्ह्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यामध्ये पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पोलीस दल आघाडीवर आहेत. जिल्हा पोलीस दलाने मास्क न वापरणाऱ्या 12 हजार 603 व्यक्तींकडून 26 लाख 81 हजार 200 रुपयांचा, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या 531 व्यक्तींकडून 1 लाख 81 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला असून 531 व्यक्तींवर गुन्हेही दाखल केले आहेत. तसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणारे 38 प्रतिष्ठानांकडून 69 हजार दंड करुन 38 प्रतिष्ठानांवर गुन्हे दाखल केले आहेत.

तर जळगाव महानगरपालिका हद्दीत आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकासह इतर पथके कार्यरत आहेत. या पथकांनी मास्क न लावणाऱ्या 1 हजार 25 व्यक्तींकडून 4 लाख 88 हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 8 व्यक्तींकडून 35 हजार रुपये, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या 5 व्यक्तींकडून 2 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या 8 प्रतिष्ठानांना 35 हजार रुपये, दंड करुन 5 प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या सार्वजनिक वाहतुक करणाऱ्या 6 वाहनांवर कारवाई करुन त्यांचेकडून 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

शिवाय जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) श्री. सतीश दिघे यांच्यासह सर्व मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथके कार्यरत असून त्यांनी मास्क न लावणाऱ्या 5 हजार 449 व्यक्तींकडून 22 लाख 14 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 7 व्यक्तींकडून 34 हजार 800 रुपये, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या 25 व्यक्तींकडून 33 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या 195 प्रतिष्ठानांना 3 लाख 76 हजार 300 रुपये दंड करुन 5 प्रतिष्ठानांवर गुन्हे दाखल केले आहेत तर 18 प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या सार्वजनिक वाहतुक करणाऱ्या 368 वाहनांवर कारवाई करुन त्यांचेकडून 1 लाख 45 हजार 200 रुपयांचा दंड वसुल केल्याचेही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.