जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२५ । सोने आणि चांदीत दरात मागच्या काही दिवसापासून सातत्याने वाढ दिसून आली असून यामुळे दोन्ही धातूंनी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. मात्र आता उच्चांक गाठलेल्या सोने आणि चांदी दरात घसरण होताना दिसत आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात घसरण झाली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.

सोन्याचा दर
जळगावमध्ये मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १४ हजार ८४५ रूपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचले होते. मात्र, बुधवारी दिवसभरात ८२४ रूपयांची घट नोंदवली गेल्याने सोन्याचे दर एक लाख १४ हजार २१ रूपयांपर्यंत घसरले. गुरूवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ५१५ रूपयांनी घट नोंदवली गेल्याने सोन्याचे दर एक लाख १३ हजार ५०६ रूपयांपर्यंत खाली आले. सोन्यात दोनच दिवसात तब्बल १३३९ रूपयांनी घट झाली.

चांदीत ४१२० रूपयांनी घट
जळगावमध्ये मंगळवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ३४ हजार ९३० रूपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचले होते. बुधवारी तब्बल २०६० रूपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर एक लाख ३१ हजार ८४० रूपयांपर्यंत खाली आले. गुरूवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १०३० रूपयांची घट नोंदवली गेल्याने चांदी प्रति किलो एक लाख ३० हजार ८१० रूपयांपर्यंत घसरली. चांदीत दोनच दिवसात ४१२० रूपयांची घट झाली.
घसरणीचे कारण काय?
फेडरल रिझर्व्हच्या महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णयापूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकदारांमध्ये मोठी सावधगिरी दिसून येत आहे. नफा नोंदणीच्या हालचालींमुळे सुवर्ण बाजारपेठेवरील दबाव वाढला असून, सोन्याचे भाव त्यामुळेच घसरले आहेत.









