जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत मंजूर झालेल्या जळगाव ते किनगाव या २४ किलोमीटरच्या नवीन काँक्रीट रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. यामुळे या परिसराच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे.

जळगाव जिल्ह्यात पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत सुमारे ४५० किलोमीटर रस्त्यांच्या कामांना सुमारे २,००० कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये जळगाव–किनगाव या २४ किलोमीटरच्या रस्त्याचाही समावेश असून या मार्गासाठी जवळपास १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. निविदेतील अटी व शर्तींनुसार कंत्राटदाराला संपूर्ण २४ किलोमीटरचा रस्ता दोन वर्षांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे.

त्यानुसार संबंधित कंत्राटदाराने गेल्या काही महिन्यांपासून कामाची गती वाढवल्याचे दिसत आहे. हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष दिले जात आहे. कामाला मिळालेली गती व यंत्रसामग्रीची वाढती तैनाती पाहता हा महत्त्वाचा रस्ते प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जळगाव–किनगाव रस्त्याच्या उभारणीला वेग येत असताना काम पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षे रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंत्राटदारावरच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबाबत अधिक काटेकोर पद्धतीने लक्ष ठेवले जात आहे. या प्रकल्पात ट्रिमिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून काँक्रीटीकरण केले जाणार असल्याने रस्ता अधिक मजबूत, टिकाऊ आणि दर्जेदार होण्याची चिन्हे आहेत. जळगाव–किनगाव रस्त्याच्या मध्यभागी सात मीटर (२३ फूट) रुंदीचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या काँक्रीट पट्ट्याच्या दोन्ही बाजूंना साईडपट्ट्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे, ज्यामुळे रस्त्याची स्थिरता आणि टिकाऊपणा वाढणार आहे.







