जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दररोज कुठेना कुठे घरफोडी झाल्याची घटना समोर येत आहेत. एकंदरीत चोरट्यांना पोलिसांचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसत आहे. यातच शहरातील पिंप्राळ्यातील नामदेव नगरात चोरीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. चोरट्याने पैसे, सोन्याचे दागिने, घरातल्या मौल्यवान वस्तू किंवा टीव्ही, फ्रिज, दुचाकी वगैरे अशा वस्तूंवर नव्हे तर १२ घरांबाहेर पडलेल्या चपला, बुटांवरच हात साफ केला.

ही घटना गुरुवारी उघडकीस आली. पिंप्राळा येथील नामदेवनगर येथे गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास १२ घरांच्या बाहेर असलेल्या चपला, बूट अज्ञात चोरट्याने लांबवले. सकाळी ७ वाजता नामदेव नगरातील रहिवासी इच्छाराम पवार यांचा नातू श्लोक हा घराबाहेर दूर शोधायला दिसले नाही. त्याच्या वडिलांनाही ते सापडले नाही.
काही वेळातच गल्लीतील चार ते पाच रहिवासी त्यांच्या घराबाहेर ठेवलेल्या चपला, बूट शोधत घराबाहेर आल्यावर चपलांची चोरी झाल्याची बाब समोर आली. तासाभरात १२ घरांच्या बाहेरून चपला, बुटांचे जोड चोरी झाल्याचे उघड झाले. दरम्यान, या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार द्यायची की नाही? याचा विचार नागरिक करत होते.