जळगाव जिल्हा

जळगावकरांनो तयार राहा! उन्हाचा चटका आणखी वाढणार? वाचा हवामान अंदाज

जळगाव लाईव्ह न्यूज । मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर आता जळगावकरांना ऑक्टोबर हीटच्या तीव्र चटक्यांचा सामना करावा लागत आहे. बुधवारी जळगावचे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दुसरीकडे जळगावमध्ये राज्यातील सर्वात कमी १७.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आलंय. यामुळे जळगावकरांना दिवसा कडक ऊन आणि रात्री गारवा असा संमिश्र अनुभूती येत आहे.दरम्यान, पुढील चार दिवसांत जळगावातील कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता.

८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान जळगावचे हवामान प्रामुख्याने निरभ्र राहणार असून, या काळात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज आहे. पुढील चार दिवसांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, दिवसा कडक ऊन आणि रात्रीही उकाडा जाणवणार आहे.

या काळात वारे मंद गतीने उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेकडून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णता कायम राहण्याची शक्यता आहे. दिवसा आर्द्रता ४० ते ५० टक्क्यांच्या आसपास राहणार असल्याने कोरडी उष्णता जाणवेल.

दिवसाच्या तुलनेत रात्री तापमानात घट होत असली तरी उकाड्यापासून जळगावकरांची सुटका होणार नाही. रात्रीच्या वेळी आर्द्रता ६० ते ७० टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता असल्याने वातावरण काहीसे दमट राहू शकते. त्यामुळे रात्री झोपतानाही उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण होत असताना जळगावमध्ये उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक उन्हात जाणे टाळावे आणि पुरेसे पाणी प्यावे, अशी काळजी घेणे आवश्यक आहे.एकीकडे मान्सूनची माघार, तर दुसरीकडे वाढता उष्मा, अशा वातावरणामुळे जळगावमध्ये आता खऱ्या अर्थाने ऑक्टोबर हीटचा अनुभव येणार आहे.

सध्या दिवसभर उन्हाचे चटके आणि उकाड्यामुळे जळगावकर नागरिक हैराण झाले आहेत. कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना रुमाल, टोपी आणि इतर उपायांचा आधार घ्यावा लागत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button