जळगावची ‘भट्टी’ झाली! पारा ४२ अंशांवर, एप्रिलमध्येच मे महिन्याची झळ

एप्रिल 14, 2026 11:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२६ । उन्हाचा तडाखा आता जीवघेणा ठरू लागला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून गेल्या २४ तासात तापमानाचा पारा तब्बल ४२.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले आहे.

tapman 1 1

गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने जळगावकर अक्षरशः घामाघूम झाले आहेत. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच तापमानाने ४२ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, किमान तापमानही २४.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

गेल्या आठवड्याभराचा विचार करता अवघ्या सहा दिवसांत तापमानात सुमारे ७ अंशांनी वाढ झाली आहे. पश्चिमेकडून वाहणारे कोरडे व उष्ण वारे आणि वातावरणातील आर्द्रतेचे घटलेले प्रमाण यामुळे जिल्ह्यात ‘हीट वेव्ह’चा प्रभाव जाणवत असल्याचे हवामान अभ्यासकांनी नमूद केले आहे.

२० एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट..

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात २० एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः पुढील दोन दिवसांत तापमान ४२ ते ४३ अंशांच्या दरम्यान स्थिर राहू शकते. यामुळे एप्रिल महिन्यातच मे महिन्यासारखे चटके जाणवू लागले आहेत.

नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी शहरातील रस्ते ओस पडू लागले आहेत. उष्माघाताचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून खालील सूचना करण्यात आल्या आहेत:
दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे.
पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवावे.
बाहेर पडताना डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करावा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now