⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

जळगावकरांनो सावधान ! पारा वाढतोय.. उष्माघातापासून अशी घ्याल काळजी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२४ । मागील काही दिवसापासून जळगावातून थंडी गायब होऊन उन्हाचा चटका वाढला. गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होताना दिसून रविवारी कमाल तापमान ३८ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे दुपारी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. दरम्यान, सोमवारी कमाल तापमान ३६ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता असून २१ मार्चपर्यंत कमाल आणि किमान तापमानात काहीशी घसरण होण्याचे संकेत आहेत. मात्र, यानंतर अर्थात २२ मार्चपासून पुन्हा तापमानात वाढ होईल.

मार्च महिनाअखेर पारा ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तर एप्रिल आणि मे महिना चांगलाच तापणार असून या महिन्यात पारा ४५ अंशावर मजल मारू शकतो. यामुळे उन्हाचा तडाखा वाढून उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात होऊ नये यासाठी आतापासूनच सजग रहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

अशी घ्या काळजी…
वाढत्या तापमानात म्हणजे दुपारी १ ते ५ वाजेदरम्यान फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे.
कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत.
उष्णता शोषून घेणारे कपडे वापरू नयेत.
सैल व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.
पाणी भरपूर प्यावे. सरबत प्यावे.
उन्हामध्ये काम करताना अधूनमधून सावलीत थोडीशी विश्रांती घ्यावी.
उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम थांबवावे, वेळीच उपचार घ्यावेत.
उन्हात बाहेर जाताना डोळ्यांवर चांगला दर्जेदार गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल यांचा वापर करावा

जागरुक राहा…
उष्माघात होऊ नये यासाठी आतापासून जागरुक राहिले पाहिजे. रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रस्तरावर प्रथमोपचार व उष्माघात नियंत्रणाच्या अनुषंगाने आवश्यक औषधी व साहित्य सामग्री सुसज्ज ठेवण्यात आली आहेत

उष्माघाताची लक्षणे…
थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता, बेशद्धावस्था आदी