वाढत्या तापमानाने जळगावकर घामाघूम; आजपासून पुढचे 4 दिवस महत्वाचे, वाचा हवामान अंदाज?

मार्च 9, 2026 10:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२६ । मागच्या काही दिवसापासून जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानाचा पारा सातत्याने चढत असून जळगावकरांना उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आजपासून पुढचे चार दिवस जिल्ह्यात हवामान पूर्णपणे स्वच्छ, कोरडे आणि अत्यंत उष्ण राहणार असून या काळात उष्ण लाटेचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.

tapman

मार्च महिन्याला सुरुवात होताच जळगावात उन्हाची दाहकता वाढली आहे. तापमानाचा पारा चाळीशीच्या नजीक पोहोचल्याने सकाळी १० वाजेपासूनच कडक उन्हाचे चटके बसत आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारी शहरातील रस्त्यांवरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. केवळ दिवसाचं नव्हे तर आता किमान तापमानाचा पाराही वाढल्याने रात्रीच्या वेळी जळगावकरांना उकाडा जाणवू लागला आहे.

पुढचे चार दिवस असं राहणार तापमान?

दरम्यान, काल रविवारी जळगावचे कमाल तापमान ३८.५ अंश तर किमान तापमान १७ अंशापर्यंत होते. दरम्यान आज ९ ते १२ मार्चदरम्यान, जिल्ह्यात तापमान ३९ ते ४१ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान १९ ते २१ अंशांच्या दरम्यान राहील. परिणामी हवा कोरडी राहणार असल्याने उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या सामान्यतः मार्चच्या पहिल्या आठवड्यात हवेतील आर्द्रता ४० ते ४५ टक्क्यांच्या आसपास असते. मात्र यंदा आर्द्रतेत मोठी घट दिसून येत असून ती थेट १८ ते ३५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे वातावरण अधिक कोरडे होत असून उकाड्याची तीव्रता वाढली आहे. हवामानातील या बदलामागे दोन प्रमुख कारणे असल्याचे हवामान तज्ज्ञ सांगतात. उत्तरेकडील भागात पश्चिमी विक्षोभ नसल्यामुळे थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्याचबरोबर गुजरात आणि राजस्थानकडून येणारे अत्यंत उष्ण व कोरडे वारे राज्यात प्रवेश करत आहेत. या दोन्ही कारणांमुळे हवेतील आर्द्रता घटली असून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories