जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२६ । मार्च महिना अखेरच्या टप्प्यात पोहोचत असताना जळगाव शहरासह जिल्ह्यात उष्णतेचा कहर पुन्हा वाढू लागला आहे. अवकाळी पावसामुळे काही दिवस दिलासा मिळाल्यानंतर आता तापमानात झपाट्याने वाढ होत असून नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. मंगळवारी जळगावचे कमाल तापमान ३७.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून पुढील काही दिवसांत उष्णतेचा पारा आणखी चढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

यंदा मार्च महिन्यात तापमानाने आग ओकायला सुरुवात केल्याने जळगावकर उष्णतेने होरपळून निघत आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तापमानाने तब्बल ४० अंशापर्यंतची मजल मारली होती. परंतु गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळाला होता.

मात्र आता अवकाळीचे सावट दूर होताच उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. रविवारी ३४ अंशाखाली असलेल्या तापमानाचा पारा गेल्या दोन दिवसात वाढून ३७ च्या पोहोचला आहे. मंगळवारी जळगावचे कमाल तापमान ३७.७ अंश सेल्सिअस इतके होते. सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात होत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत बाजारपेठेत आणि मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. किमान तापमानातही वाढ झाली असून रात्रीचा उकाडाही जाणवू लागला आहे.सध्या तापमानासोबतच हवेतील आर्द्रता वाढल्याने जळगावकर घामाघूम होत आहेत.
दरम्यान, २७ मार्चपर्यंत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.







