जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२६ । जळगाव जिल्ह्यावर मागील तीन दिवसांपासून अवकाळी वातावरणाचे सावट कायम असल्याने हवामानात लक्षणीय बदल जाणवू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली असून जळगावकरांना कडक उन्हापासून बराचसा दिलासा मिळाला आहे.

मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तापमानाने मोठी झेप घेतली होती. गेल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. यामुळे सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचे चटके बसत होते. तर दुपारच्या वेळेस कडाक्याचे ऊन आणि उष्णतेची लाट जाणवत असल्याने रस्ते ओस पडले होते. मात्र यातच हवामान खात्यानं जळगावसह राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता.

त्यानुसार अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेल्या २४ तासात जळगावचे कमाल तापमान ३३.८ अंश तर रात्रीचे किमान तापमान १९.२ अंश इतके होते. तापमानात घसरण झाल्याने उष्णतेच्या झळांपासून जळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र आगामी एक दोन दिवसात अवकाळीचा सावट निवळणार असून यामुळे तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असाल तर मात्र दुसरीकडे यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी झालेल्या पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
आज या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
आज मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.







