जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२६ । गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशावर गेल्याने तीव्र उष्णतेच्या लाटेने जळगावकर प्रचंड होरपळून निघाले होते. मात्र, आता या वाढत्या पाऱ्याला ब्रेक लागला असून जळगावकरांना कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत जळगावच्या तापमानात तब्बल ३ अंश सेल्सिअसची लक्षणीय घट झाली असून १५ मे रोजी जळगावचे तापमान ४२.४ अंशांवर खाली आले आहे. तापमानात घसरण झाली असली तरी उकाडा कायम होता.

गेल्या काही दिवसापासून जळगावचे तापमान ४५ अंशापेक्षा जास्त होते. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. दिवसासह रात्रीच्या देखील तापमान वाढ झाल्याने असह्य उकाड्याने नागरिक घामाघूम झाले होते. १४ मे रोजी जळगाव शहराचे कमाल तापमान ४५.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. मात्र, हवामानात अचानक बदल झाल्याने १५ मे रोजी तापमान घसरून ४२.४ अंश सेल्सिअसवर आले. अवघ्या एका दिवसात झालेल्या या मोठ्या घसरणीमुळे नागरिकांना तीव्र उष्णतेपासून काही प्रमाणात आराम मिळाला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जळगावकरांना पुढील काही दिवसही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. २० मेपर्यंत तापमान ४२ ते ४३ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने उष्णतेची तीव्रता आणखी कमी होऊ शकते.







