जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उन्हाच्या तीव्र झळा वाढल्याचे चित्र आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने झेप घेतल्याने जळगावकर उकाड्याने हैराण झाले आहेत. पुढील काही दिवस नागरिकांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार १२ ते १५ मार्च दरम्यान जिल्ह्यात सौम्य उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता असून तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, बुधवारी तापमानाने ४०.३ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला, त्यामुळे दुपारच्या सुमारास शहरातील रस्त्यांवर नेहमीपेक्षा कमी वर्दळ दिसून आली. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिल्याने दुपारच्या सुमारास उकाड्यात अधिक भर पडली. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. सकाळच्या सुमारास उन्हाची तीव्रता तुलनेने कमी असली, तरी दुपारनंतर तापमान झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले. कडक उन्हामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर पडणे टाळल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिवसानंतर रात्रीच्या उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे.
आगामी चार दिवस असे राहणार?
हवामान अभ्यासकाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस जळगावात अत्यंत उष्ण वातावरण राहणार आहे. या काळात कमाल तापमान ३९ ते ४२ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता असून किमान तापमानही १८ ते २२ अंश राहणार आहे. त्यामुळे दिवसासह रात्रीही उकाडा कायम राहू शकते.यापूर्वी हवामान खात्यानं १० आणि ११ मार्च रोजी जळगावात येलो अलर्ट जारी करून उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविला होता.
यामुळे उष्णतेत वाढ?
यावर्षी आर्द्रतेत मोठी घट झाल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात आर्द्रता ४० ते ४४ टक्के असते; मात्र यंदा ती १८ ते ३५ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. त्यामुळे हवेत ओलावा कमी होऊन उष्णतेचा परिणाम अधिक तीव्र जाणवत आहे. दरम्यान, १५ मार्चनंतर हवामानात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली असून त्या काळात कमाल तापमानात थोडी घट होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.







