जळगावकर कामाशिवाय बाहेर पडणे टाळा, पुढील ३ दिवस काळजी घेण्याचे आवाहन

मे 11, 2026 10:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२६ । जळगावकर पुन्हा एकदा तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत. रविवारी जळगावचे कमाल तापमान ४४.५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २८.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय दुपारी बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

tapman 1 1

यंदाच्या हंगामात मे महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात ४४.६ अंश सेल्सिअस या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली होती. त्याखालोखाल रविवारी नोंदवले गेलेले ४४.५ अंश तापमान हे या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान ठरले आहे. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे पारा ४० अंशांच्या आसपास स्थिरावला होता. मात्र, आता पुन्हा अचानक उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या वेळीही उष्ण वारे वाहत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

१३ मे पर्यंत उष्णतेचा प्रभाव कायम राहणार

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात ११ ते १३ मे दरम्यान कमाल तापमान ४१ ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः ११ आणि १२ मे रोजी काही भागांत तापमान ४४ अंशांच्या पार जाण्याची भीती आहे. १३ मे नंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असली, तरी उष्णतेचा दाह आणि रात्रीचा उकाडा (२६ ते २९ अंश सेल्सिअस तापमान) कायम राहील.

सध्या सकाळी ९ वाजल्यापासूनच दुपारसारखे कडक ऊन जाणवत असून, वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता आणखी वाढत असल्याने शहरातील प्रमुख रस्तेही ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

१५ मे नंतर वादळी पावसाची शक्यता (मान्सूनपूर्व हालचाली)

जळगावकरांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास सुरुवात झाली असून मान्सूनपूर्व हालचाली सक्रिय होत आहेत. हवेतील ओलावा हळूहळू वाढू लागल्याने, १५ मे नंतर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तोपर्यंत नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तापमान वाढीची प्रमुख कारणे काय?

उत्तर भारतातील सक्रिय उच्च दाब क्षेत्रामुळे गरम आणि कोरडी हवा दक्षिणेकडे सरकत आहे. आकाश पूर्णपणे निरभ्र असल्याने सूर्याची तीव्र किरणे थेट जमिनीवर पडत आहेत. यामुळे जिल्ह्यातील घटलेले वनक्षेत्र, ओसाड जमीन आणि वाढत्या काँक्रिटीकरणामुळे उष्णता जमिनीत शोषली जाऊन पुन्हा हवेत सोडली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now