जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाने चाळीशीचा टप्पा पार केला आहे. मंगळवारी (१० मार्च) जळगावचे तापमान तब्बल ४०.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे, चालू हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले असून उकाड्यामुळे जळगावकर हैराण झाले आहेत.

ममुराबाद येथील हवामान वेधशाळेत ही नोंद करण्यात आली. गेल्या चार दिवसांत तापमानात तब्बल तीन अंशांनी वाढ झाल्याने उष्णतेची तीव्रता आणखी वाढली आहे. सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवत असून दुपारच्या सुमारास रस्तेही तुलनेने ओस पडताना दिसत आहेत.

दरम्यान, राज्यात अकोला येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून तेथे पारा ४०.७ अंशांवर पोहोचला. त्यानंतर जळगाव शहर राज्यातील दुसरे सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाने यापूर्वीच जळगाव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे तसेच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज बुधवारी (११ मार्च) देखील तापमान ४० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उकाडा आणखी वाढण्याची शक्यता असून नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
काय काळजी घ्यावी?
पुरेसे पाणी प्या, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका.
दुपारी 12 ते 3 या वेळेत शक्यतो कडक उन्हात बाहेर जाणे टाळा.
सुती आणि सैल कपडे वापरा, बाहेर जाताना छत्री किंवा टोपीचा वापर करा.
लहान मुले आणि ज्येष्ठांनी विशेष काळजी घ्यावी, कारण त्यांना उष्माघाताचा त्रास लवकर होऊ शकतो.







