जळगाव एसटी विभागाने राज्यातील सर्व विभागांना टाकले मागे !
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३ । एकूण उत्पन्न कमाईत जळगाव जिल्ह्यातील एसटी विभागाने राज्यातील सर्व विभागांना मागे टाकले आहे. सलग तीन दिवस एक कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळवून हॅटट्रिक साधली आहे. हा आजपर्यंतचा उच्चांक मानला जात आहे.
लग्नसराईची धामधूम, महिला प्रवाशांना सवलत व ७५ वर्षे वयावरील वृद्धांना विनामूल्य प्रवास दिल्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढले आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे जळगाव विभाग अव्वल ठरला आहे.
९ मे रोजी २ लाख ६३ हजार प्रवाशांनी एसटी बसने प्रवास केला. यात ९८ हजार महिलांचा समावेश आहे. अमृत योजनेअंतर्गत ३५ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. मंगळवारी आगारांच्या माध्यमातून ६९९ बसेसद्वारे दोन लाख ८० हजार किलोमीटर पूर्ण करण्यात आले. उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जळगाव विभागातील १२६२ चालक ३७९ चालक कम वाहक व १४४० वाहकांनी यशस्वी कामगिरी बजावल्यामुळे प्रत्येक आगारात जास्त उत्पन्न आणणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर होते. त्यांनी कर्मचाऱ्यांचा गौरव करून उत्साह वाढविला. प्रास्ताविक नरेंद्रसिंग राजपत (इंटक संघटना) यांनी केले. आर.के. पाटील (कामगार सेना) यांनी मनोगत व्यक्त केले.
विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधीक्षक किशोर महाजन, कामगार अधिकारी कमलेश भावसार, विभागीय अभियंता नीलेश पाटील, सहायक वाहतूक अधीक्षक राजेश देशपांडे व सांख्यिकी अधिकारी रवींद्र पाटील यांनी विशेष सहभाग घेतला. एसटी कामगार सेनेचे गोपाळ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी रतन कोळी (कष्टकरी जनसंघ) यांनी आभार मानले. अकील मनियार, उमेश वाणी, योगेश वाणी, संतोष धाडी. सुनील पाटील, श्रीकृष्ण चौधरी, शैलेंद्र जाधव, राजू नन्नवरे, प्रदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला.