⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावातील शिवसेना कार्यालयाचे भाग्य उजळले पण..

जळगावातील शिवसेना कार्यालयाचे भाग्य उजळले पण..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । जिल्ह्यातील शिवसेनेचे मुख्य कार्यालय अद्यापही उपेक्षितच असून नेहमी बंद राहत असल्याचे वृत्त जळगाव लाईव्ह न्युजने प्रकाशित केले होते. शनिवारी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यालय उघडण्यात आले परंतु कार्यालयातील अवस्था जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकाला लाजवेल अशीच आहे. दरम्यान, शिवसेनेचे जळगाव शहर संपर्कप्रमुख व महानगर अध्यक्ष यांच्याशी कार्यालय नूतनीकरणा संदर्भात चर्चा झाली आहे.

जळगाव जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होत असून जिल्ह्यात शिवसेनेचे मंत्री, आमदार, महापौर, उपमहापौर व इतर सदस्य आहेत. शिवसेनेच्या लाखो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फळी असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले शिवसेनेचे मुख्य कार्यालय अद्यापही अपेक्षितच आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासह अनेक दिग्गज जळगाव जिल्ह्यात असतानाही कार्यालय बंद असल्याचे वृत्त जळगाव लाईव्ह न्युजने प्रकाशित केले होते. वृत्तानंतरही कार्यालय बंद होते मात्र शनिवारी शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यालय उघडून त्याची स्वच्छता करण्यात आली.

शहरातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम देखील पार पडला. जळगाव लाईव्ह न्यूजच्या प्रतिनिधीने दुपारी कार्यालयात पाहणी केली असता कार्यालयातील सोफे फाटलेल्या अवस्थेत, पाण्याने ओलसरपणा आल्यामुळे भिंतीच्या रंगाचे पापुद्रे निघाले होते, मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी गळत असल्याने गंजलेले शटर, अनेक महिन्यांपासून स्वच्छता न केलेला पंखा अशी अवस्था असल्याचे दिसून आले.

जिल्ह्यातील शिवसेना कार्यालयात विविध सुधारणा करण्यासंदर्भात महानगराध्यक्ष शरद तायडे यांच्याशी व पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली असून लवकरच त्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. चर्चेत नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे, असे संपर्क प्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले.

शिवसेनेच्या कार्यालयाचे भाग्य आज काहीसे फळफळले असले तरी शिवसेनेच्या कार्यालयाचा जीर्णोद्धार करण्यासाठी कुणाला तरी पुजारी होऊन पुढे येण्याशिवाय गत्यंतर नाही.
हे देखील वाचा : जळगावातील शिवसेनेच्या कार्यालयाला लागली उतरती कळा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.