जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । शहरातच नव्हे तर जिल्ह्यात शिवसेना दिवसेंदिवस बळकट होत चालली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे पालकमंत्री, आमदार, महापौर व उपमहापौर, मनपा सदस्य आणि लाखो पदाधिकारी व कार्यकर्ते असताना शिवसेनेचे मुख्य कार्यालय मात्र शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी मोठा गाजावाजा असलेल्या शिवसेना कार्यालयाला सध्या घरघर लागून असून पदाधिकारी ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. शिवसेनेचा ढाण्या वाघ आणि प्रति मुख्यमंत्रीच शहरात असून कार्यालयाला न्याय देऊ शकत नसतील तर इतरांचे न बोललेलंच बरे..!
एकेकाळी काँग्रेसचा आणि नंतर भाजपचा बालेकिल्ला असलेले जळगाव सध्या शिवसेनामय होण्याच्या दिशेने कूच करीत आहे. शिवसेनेचे नेते, मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील सलग दुसऱ्यांदा मंत्री झाले. सध्या त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आपली पाळेमुळे भक्कम करीत आहे. शिवसेनेचे अस्तित्व पहिल्यापासूनच जिल्ह्यात कायम आहे. जिल्ह्यात प्रत्येक प्रमुख पक्षाचे मुख्य कार्यालय जळगाव शहरात असून प्रशस्त आहे. काहींचे स्वमालकीचे असून काहींचे भाड्याने घेतलेले आहे. शिवसेनेचे जिल्हा कार्यालय गोलाणी व्यापारी संकुलातील गाळ्यात आहे. पक्षाच्या कार्यालयाची आजची अवस्था लक्षात घेतली तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला लाजवेल अशी आहे.
शिवसेना सांगायला जिल्ह्यात खूप आहे. एक पालकमंत्री, तीन आमदार, एक महापौर, एक उपमहापौर, मनपा, नपा सदस्य अशी मोठी फळीच आहे. शिवसेना मजबूत करताना इनकमिंग करणाऱ्यांची रांग मोठी आहे पण प्रवेश सोहळे मात्र कुठेतरी महानगराध्यक्षांच्या कार्यालयाच्या अंगणात किंवा अजिंठा विश्रामगृहात पार पाडले जातात. इतकंच काय तर पक्षाचा आढावा घ्यायला जिल्ह्यात आलेले मुख्य नेते खा.संजय राऊत यांना एका उद्योगपतीला भेटायला, आलिशान हॉटेलमध्ये बैठका घ्यायला वेळ आहे पण कार्यालय कुठे आहे आणि कसे आहे याची साधी पाहणी देखील त्यांनी केली नाही. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची संपत्ती २ हजार कोटींची झाली असे आरोप होतात, पालकमंत्री घराचे नूतनीकरण करतात, शासनाकडून जिल्ह्यात विकासासाठी कोटींची उड्डाणे घेतली जातात, पक्षाच्या नावाखाली करोडोंचे ठेके पदरात पाडून घेतले जातात, शासकीय उपक्रम, योजनांचे शिवभोजन घेतले जाते पण पक्षनिधी उभारत स्वमालकीचे किंवा प्रशस्त हक्काचे शिवसेना कार्यालय उभारण्याचा विचार केला जात नाही. शिवसेना पदाधिकारी दुर्लक्ष करीत असले तरी एकदा त्यांनी कार्यकर्त्यांना आवाज दिला तर कार्यकर्ते जीवाचे रान करून पक्षासाठी निधी उभारतील यात शंका नाही. एकेकाळी शिवसेना कार्यालय जळगावातील शिवसैनिकांसाठी मातोश्री होते. दिवसभर कुणीतरी त्याठिकाणी कामानिमित्त ये-जा करायचे. दररोज कार्यालयात दैनिक, वार्तापत्र येत होते, कार्यालयाचा स्वतंत्र संपर्क क्रमांक होता, इंटरनेटची व्यवस्था होती पण आज काय तर सोफा देखील बसण्यालायक राहिला नाही. मागे तर एका कर्मचाऱ्याला कितीतरी महिने पगार मिळाला नव्हता. माध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाल्यावर त्याचा पगार झाला.
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येकाला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मंत्र दिला होता पण आज जिल्ह्यात काय शिवसेनेत येऊन राजकारण आणि समाजकारणाला फाट्यावर मारत केवळ स्वहितकारण केले जात आहे. शिवसेना कार्यालयाच्या डोक्यावर महापौर, उपमहापौर आणि इतर सेना सदस्य बसतात पण कार्यालयात मात्र कधी फेरी मारली जात नाही. शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन जर आज सक्रिय राजकारणात असते तर त्यांनी कार्यालयाचा चेहरामोहरा नक्कीच बद्दलवला असता. गेल्या काही वर्षांपासून सेना कार्यालयाला उतरती कळा लागली असून जो तो आपले भले करण्यात व्यस्त आहे. आज कुणीही शिवसेना कार्यालयाकडे फिरकताना दिसत नाही. इतकंच काय तर शिवसेनेचे दोन दिग्गज नेते जिल्ह्यात असताना देखील कार्यालयाला टाळे ठोकलेले होते. ज्या कार्यालयात कधीकाळी गप्पा रंगायच्या, राजकारण शिजयचे, पत्रकार परिषदा घेतल्या जायच्या त्या कार्यालयाबाहेर सध्या कार्यकर्ते नव्हे तर कुत्र्यांची जत्रा पाहायला मिळते. केसाला उंदरी लागल्याप्रमाणे जिल्ह्याच्या शिवसेनेतून कार्यालयाला मोठा खड्डा पडल्याचे दिसून येते.
आलिशान हॉटेलमध्ये सोशल डिस्टनसिंगच्या नियमांची पायमल्ली करण्यासाठी जमलेल्या प्रत्येकाकडून दंडापोटी आकारली जाणारी रक्कम पक्षाने वसूल केली तरी तेवढ्या रकमेत शिवसेना कार्यालयाचा चेहरामोहरा बदलून जाईल हे निश्चित आहे. शिवसेनेतील एक कार्यकर्ता स्वतःची हॉटेल आणि एक हॉल पक्षासाठी देऊ शकतो हीच एक चांगली बाब सध्या दिसून येते. खासदारकी, आमदारकीचे स्वप्न पाहत असलेले शिवसेना जिल्हा प्रमुख आणि नवनिर्वाचित पदाधिकारी जातीने लक्ष घालत पक्ष कार्यालय सुधारणा आणि हक्काच्या जागेसाठी काय पाऊले उचलतात हे तर येणारा काळच आपल्याला सांगेल हे निश्चित..!