⁠ 
शनिवार, मे 4, 2024

श्रावणसरींमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा, आगामी काही दिवस.. हवामान खात्याचा अंदाज जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२३ । विश्रांतीनंतर पावसाने राज्यामधील काही भागातच हजेरी लावली. अद्यापही काही भागात पावसाची प्रतीक्षा आहे. श्रावण महिना सुरू होताच जळगाव जिल्ह्यात देखील पावसाच्या सरी बरसल्या. जिल्ह्यात शनिवारी एकूण ६ मिमी पाऊस झाला. या श्रावणसरींमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे; मात्र पावसाचा जोर आगामी काही दिवस कायम राहण्याची शक्यता कमी आहे. मध्यम व किरकोळ पावसाचा अंदाज आगामी काही दिवसात व्यक्त करण्यात आला आहे.

यंदा जूनमध्ये पावसाने पाठ फिरवल्यानंतर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला; मात्र ऑगस्ट महिन्यात देखील जून महिन्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी खारीच्या पिकांनी माना टाकल्या होत्या. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला होता. मात्र, १८ ऑगस्टनंतर जळगाव जिल्ह्यासह राज्यातील काही भागात पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. मागील दोन तीन दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने पिकांना मोठा आधार मिळाला.

दरम्यान, आगामी २३ ते २४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ढगांची निर्मिती झाली तर काही तालुक्यात दमदार पाऊसदेखील होऊ शकतो. तर काही ठिकाणी मात्र किरकोळ पाऊस किंवा केवळ ढगाळ वातावरण कायम राहण्याचाही अंदाज आहे.

आज राज्यातील कुठे पाऊस?
दरम्यान, हवामान विभागाने आज विदर्भ,कोकण तसेच घाटमाथा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. मान्सूनचा आस हा पूर्व स्थितीकडे आला असल्याने महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.