सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगावच्या पोलिसांची कारवाई

मे 17, 2026 11:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील सार्वजनिक ठिकाणी आणि भर रस्त्यावर दारू पिऊन नागरिकांना त्रास देणाऱ्या तळीरामांविरुद्ध जळगाव पोलिसांनी आता थेट आणि मोठी मोहीम उघडली आहे. स्वतः जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रस्त्यावर उतरत या धडक कारवाईचे नेतृत्व केले. पोलीस प्रमुखांनाच अचानक कारवाई करताना पाहून रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांची चांगलीच पळापळ झाली.

taliram

वाईन शॉपच्या आडोशावर पोलिसांचा दणका

शहरातील अनेक वाईन शॉप्स आणि बिअर शॉपीच्या बाहेर, तसेच मुख्य रस्त्यांच्या कडेला उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या वाढली होती. यामुळे महिला, लहान मुले आणि सर्वसामान्य नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. या वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः पथकासह शहरात गस्त घातली आणि वाईन शॉपच्या आडोशाला चालणाऱ्या बेकायदेशीर अड्यांवर अचानक छापे टाकले.

तळीरामांचे धाबे दणाणले

नेहमीप्रमाणे रस्त्यावर दारूची पार्टी झोडणाऱ्या तळीरामांसमोर अचानक पोलीस अधीक्षक स्वतः उभे ठाकल्याने मद्यपींची शुद्धच हरपली. या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या अनेक जणांना पोलिसांनी जागेवरच ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या धडक मोहिमेमुळे नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करणाऱ्या वाईन शॉप चालकांचेही धाबे दणाणले आहेत.

शहरात पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’

“सार्वजनिक शांतता आणि महिलांची सुरक्षा याला जळगाव पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य असेल. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून उपद्रव करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील,” असा कडक इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे जळगावच्या नागरिकांनी आणि विशेषतः महिलांनी सुटकेचा श्वास सोडत पोलिसांचे आभार मानले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now