जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२५ । शेअर ट्रेडिंगमधून जास्तीचा नफा कमावून देण्याचे आमिष देऊन सायबर ठगांनी अनेकांना गंडवल्याचे ऐकले आहे. पण जळगावात महिला पोलिस कर्मचारी अर्चना प्रभाकर पाटील हिने दोन महिला पोलिसांना सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास ज्यादा नफा देण्याचे आमिष दाखवून तब्बल ३० लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. या प्रकरणी ७फेब्रुवारी रोजी अर्चना पाटील हिच्यासह सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महिला सहाय्य कक्षामध्ये पोलिस शिपाई असलेल्या मंगला सुभाष तायडे (३८, रा. पोलिस लाईन) यांनी फिर्याद दिली असून त्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सहायक कक्षात कार्यरत आहे. २०१७ते जानेवारी २०२४ या कालावधीत त्या एमआयडीसी पोलिसात कार्यरत होत्या. तेव्हा त्यांची ओळख अर्चना पाटील हिच्याशी होऊन मैत्री झाली.
अर्चनाने सन २०२२ मध्ये मंगलाला एक चांगली योजना आली असून सोन्यात गुंतवणूक केल्यास ज्यादा नफा मिळतो. मात्र हा व्यवहार विनाकागदपत्र होतो. नफ्यामुळे तुझे भले होईल सांगून तिने तिचा विश्वास संपादन केला. अर्चनाची आई कल्पना प्रभाकर पाटील हिनेही मंगलाला मुलीवर विश्वास ठेवण्यास सांगितले. अखेर फिर्यादी मंगला यांनी १४ जानेवारी २०२२ रोजी ७० हजार रूपये दिले. दुसऱ्याच महिन्यात तिला ५ हजाराचा नफा मिळवून दिला.
त्यानंतर फिर्यादी रक्कम वाढवून देत असताना वाढीव मोबदला अर्चना देत गेली. त्यामुळे तिच्यावर विश्वास बसला. त्यानंतर फिर्यादीने अर्चना यांना २० लाख रुपये दिले. मंगला तायडे यांची मैत्रीण वैशाली गायकवाड (महिला पोलिस शिपाई) यांनीही घर विकून आलेले १० लाखाची रक्कम अर्चना, तिचा मित्र मिरखाँ नुरखाँ तडवी, बहिणीचा मुलगा विजय रतीलाल पवार यांच्याकडे सोन्यामध्ये पैसे गुंतवण्यास दिले.
मंगला तायडे यांनी मे २०२४ मध्ये अर्चना हिला गुंतवलेले पैसे परत देण्यास सांगितले. पण, तिने लोकसभा, विधानसभा निवडणूकीचे कारण सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. पोलिसात तक्रार होईल म्हणून अर्चना हिने सायलेंट ग्रुप नावाने व्हॉटसअॅप ग्रुप तयार केला. त्यावर तिने गुंतवणुकदारांना पैसे परत मिळतील, असा मेसेज पाठवला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मंगला व वैशाली यांनी शुक्रवारी शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अर्चना पाटीलसह तिची आई कल्पना पाटील, बहिण मोनिका पाटील, बहिणीचा मुलगा विजय पाटील, मित्र मिरखा नुरखा तडवी, मानसी रवींद्र पाटील, मनीषा चव्हाण या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अर्चना पाटील हिला अटक केली आहे.अर्चना पाटील हिच्याबद्दल तक्रार अर्ज देण्यात आल्यानंतर त्याची चौकशी होऊन तिला निलंबित करण्यात आले व निलंबन काळात मुख्यालयात जमा केले.