जळगाव लाईव्ह न्यूज | 30 मे 2024 | यंदा मे हिटच्या तडाख्याने जळगावकरांना अक्षरशः हैराण केलं. जवळपास दोन आठवडे उष्णतेची लाट कायम राहिली. यामुळे उन्हाच्या झळांनी होरपळून निघत असलेल्या जळगावकरांना अखेर जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात २ जूनपासून मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील तापमानात घट होईल.
एप्रिल महिन्यापासून जिल्ह्याचा पारा ४० अंशाच्या पुढेच राहिला आहे. त्यातल्या त्यात मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तर पारा ४५ अंशापर्यंत पोहोचला होता. जबरदस्त उन्हाच्या झळांमुळे अंगाची लाहीलाही होत होती. बुधवारी देखील पारा ४२ अंशावर कायम होता. त्यात जळगाव शहर व परिसरात २५ किमी वेगाने वारे वाहत असल्याने उष्णतेच्या झळा अधिकच बसत होत्या.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात मध्यंतरी निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे व मान्सूनच्या आगमनाआधी समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे २ जूनपासून जिल्ह्यात पावसाची स्थिती निर्माण होत आहे. २ जून ते १० जूनपर्यंत म्हणजेच मान्सूनच्या आगमनापर्यंत ढगाळ वातावरण व पावसाची स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन, पारा ४० अंशाच्या खाली येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
आगामी पाच दिवसांच्या तापमानाचा अंदाज:
दिनांक, तापमान आणि वातावरणाची स्थिती
३० मे रोजी तापमान ४३ अंशपर्यंत, वातावरण मुख्यतः निरभ्र व कोरडे राहील.
३१ मे रोजी तापमान ४२ अंशपर्यंत, काही अंशी ढगाळ वातावरण राहील
१ जून रोजी तापमान ४२ अंश, काही अंशी ढगाळ वातावरण राहील
२ जून रोजी तापमान ४१ अंशपर्यंत, ढगाळ वातावरण राहील तर सायंकाळी पावसाचा अंदाज
३ जून रोजी तापमान ४० अंशपर्यंत, ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज