जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात मार्चच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. जळगावचे कमाल तापमान ३८ अंशाच्या वर पोहोचले आहे. वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून यामुळे जळगावकर हैराण झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. जळगावकरांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाळा तीव्र होताना दिसत आहे. १ मार्च रोजी जळगावचे कमाल तापमान ३२.३ इतके होते. मात्र, ५ मार्च रोजी जळगावचे तापमान ३८.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. यामुळे सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा चटका बसत असून दुपारी घराबाहेर पडणे कठीण होत आहेत. गुरुवारी रात्रीचे किमान १६ अंशावर होते. मात्र रात्रीच्या उकाड्यातही वाढ होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात जाणवणारी उष्णतेची तीव्रता यंदा मार्चच्या सुरुवातीलाच जाणवत असल्याने आगामी दिवसात उष्णता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस हवामान पूर्णपणे कोरडे राहणार असून त्यामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात जिल्ह्यातील तापमान ४० अंशांच्या जवळ पोहोचू शकते, तर मार्च महिन्याच्या अखेरीस पारा ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यापूर्वी २०२२ मध्ये मार्च महिन्यात तापमान ४३ अंशांपर्यंत पोहोचले होते आणि त्या वेळी दोन उष्णतेच्या लाटा अनुभवल्या गेल्या होत्या. यंदाही मार्चमध्ये किमान एका उष्णतेच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, वाढत्या तापमानामुळे अवकाळी पावसाचेही संकेत मिळत आहेत. हवामान अभ्यासकांच्या मते, तापमान वाढल्यामुळे समुद्रातील पाण्याची वाफ होऊन बाष्प तयार होते, ज्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जळगावकरांना एका बाजूला कडक उन्हाचा तडाखा आणि दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा धोका अशा दुहेरी परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.
आगामी पाच दिवस असं राहणार दिवसाचं तापमान?
६ मार्च : ३७
७ मार्च : ३८
८ मार्च : ३८
९ मार्च : ३९
१० मार्च : ३९







