⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

वेबसीरिजच्या कथानकाप्रमाणे होत होती रेमेडीसीवरची विक्री

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । कोरोनाच्या संकटात रुग्णांच्या जीवाशी आणि भावनांशी खेळ करणाऱ्यांची कुठेच कमी नाही. जळगाव शहरात तर तरुणांची एक टोळी चक्क वेबसिरीजच्या कथानकाप्रमाणे रेमेडीसीवर इंजेक्शनची विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक-एक धागा गवसला असता मोठी साखळीच पोलिसांच्या हाती लागली आहे. 

रेमेडीसीवरचा काळाबाजार कोरोनाची दुसरी लाट लागताच सुरू झाला. अवघ्या ७०० ते १५०० रुपयांना मिळणारे इंजेक्शन काळ्याबाजारात १५ ते ३० हजाराला विक्री केले जात आहे. टोसीझुमॅब व सारखे कंटेंट असलेले ३० ते ३५ हजारांचे इंजेक्शन १ ते अडीच लाखांना विक्री होत आहे. रुग्णाला गरज असल्याने कुठेही वाच्यता होत नसली तरी प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.

पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने गुरुवारी एकाला रेमेडीसीवर विक्री करताना पकडले. तरुणाची चौकशी करता मोठी टोळीच समोर येऊ लागली. रुग्णालय प्रशासनापासून मेडिकल ते मेडिकल रिप्रेझनटेटिव्हपर्यंत अनेकांचा हात यात बरबटलेले आढळून आले. दुपारी ३ पासून सुरू झालेला तपास रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर आली. 

रुग्णालयातून एखाद्या रुग्णाच्या नावाने गायब केलेले इंजेक्शन संबंधित टोळीतील एखादा तरुण ताब्यात घेतो. रुग्णाचे नातेवाईक  औषधी कंपनी प्रतिनिधी किंवा मेडिकल चालकाशी संपर्क साधतात. गरज असल्याने ते चढ्या भावाने इंजेक्शन घेण्यास तयार होतो. भाव ठरल्यानंतर पैसे रोखीने किंवा ऑनलाईन मागविले जातात. पैसे स्वीकारताना कुठेच इंजेक्शनचा उल्लेख न करता सॅनिटरी पॅड किंवा इतर वस्तू म्हणून उल्लेख केला जातो. पैसे हातात पडताच ठरलेल्या ठिकाणी एखादा खांब, घराची भिंत, बंद दुकान किंवा इतर कोणत्याही प्रमुख ठिकाणच्या जवळपास इंजेक्शन ठेवण्यात येते आणि तिथून ग्राहकाला ते घेऊन जाण्यास सांगितले जाते. इंजेक्शनच्या जवळच टोळीतील एखादा तरुण लक्ष ठेऊन उभाच असायचा अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.