---Advertisement---
जळगाव शहर

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : घरगुती सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

farmers should keep homemade soybean seeds
---Advertisement---

 

farmers should keep homemade soybean seeds

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । सोयाबीन बियाण्यांचा भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरगुती सोयाबिन बियाणे पेरणीसाठी वापरावे, त्यासाठी घरचे सोयाबीन बियाणे राखुन ठेवावे. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

---Advertisement---

सध्या बाजारात सोयाबीनचा भाव वधारला असल्याने बियाणे कंपन्याही सोयाबीन बियाण्याचे दर मागील वर्षापेक्षा जास्त दराने आकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीन बाजारात न विकता येत्या खरीप हंगामासाठी राखुन ठेवावे. स्वत:ची गरज भागवून शिल्लक असलेले बियाणे आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिल्यास, देणारा व घेणारा दोन्ही शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल.

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने पेरण्यात येणारे बियाणे सरळ वाणाचे आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबीन हे बियाणे म्हणून शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो.

सोयाबीन बियाणे हे अधिक संवेदनशील आहे. साठवणुक व हाताळणी दरम्यान तापमान आणि हवेतील आद्रतेचा बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. सोयाबिन बियाणे साठवणुक करतांना पोत्यांची थप्पी 7 फुटा पेक्षा जास्त नसावी याची दक्षता घ्यावी. उगवणक्षमतेची चाचणी पेरणीच्या एक अथवा दोन आठवड्यापूर्वी करावी. सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चांगली म्हणजे 70 टक्के पेक्षा जास्त असले तर शिफारस केल्याप्रमाणे पेरणीसाठी हेक्टरी 75 किलो बियाणे वापरावे. उगवणक्षमता 60 टक्के असल्यास हेक्टरी 80 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच हलक्या व कमी पाणी उपलब्ध असलेल्या जमिनीत सोयाबिनच्या तीन ओळी व तुरीची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घेऊन पेरणी केल्यास उत्पन्नात वाढ होईल.

याबाबत शेतकरी बांधवाना काही समस्या असल्यास कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---