जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२५ । जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ६ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शाहू महाराज नगरातील तपस्वी हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली.
पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एजाज मलीक यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात प्रचाराला सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी उमेदवारांनी छत्रपती शाहू महाराज नगर, हौसिंग सोसायटी, दत्त कॉलनी, इंदिरा नगर आणि खान्देश मील कॉलनी परिसरात झंझावाती पदयात्रा काढली. यावेळी अनेक ठिकाणी गृहिणींनी उमेदवारांचे औक्षण करून आणि पेढा भरवून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.

प्रभाग ६ चे ‘तुतारी’चे शिलेदार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने प्रभाग ६ मधून पाटील हेतल महेंद्र (प्रभाग ६ अ), प्रेरणा रामेश्वर मिश्रा (प्रभाग ६ ब), तनवीर अब्दुल राशिद शेख (प्रभाग ६ क), किरण लक्ष्मण राजपूत (प्रभाग ६ ड) या उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे.

उमेदवारांनी “तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटण दाबून विकासाला साथ द्या,” असे आवाहन मतदारांना केले आहे. प्रचाराचा हा वेग कायम राखत, उद्या सोमवार रोजी सकाळी निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा शुभारंभ होणार आहे. शहरातील ऐतिहासिक ‘चिमुकले श्रीराम मंदिर’ येथे नारळ फोडून उद्याच्या प्रचाराची सुरुवात केली जाईल, अशी माहिती पक्ष प्रतिनिधींनी दिली आहे.
मतदान १५ जानेवारीला
जळगाव महानगरपालिकेसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. प्रभागातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाचे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मैदानात उतरल्याने प्रभाग ६ मध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.




