⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

जळगाव महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांचा ‘गणपती डान्स’

जळगाव लाईव्ह न्यूज | २८ सप्टेंबर २०२३ | जळगाव शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. जळगाव शहराचा पहिला मानाचा गणपती मानल्या जाणाऱ्या महापालिकेतील गणरायाची सकाळी पुजा व आरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी ढोलताशांच्या गजरावर ठेका धरत ‘गणपती डान्स’ केला. यावेळी मावळते पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारीही सहभागी झाले होते.

जळगाव शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. मानाच्या महापालिका गणपतीपासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या मिरवणुकीत महापालिकेचे अधिकारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. गणपती मंडळ कार्यकर्त्यांच्या भुमिकेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पिवळ्या रंगाचे कुर्ता व पांढरा पायजमा परिधान केला आहे तर महिलांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. सर्वांनी भगव्या व गुलाबी रंगाचे फेटे देखील परिधान केले आहे.

विसर्जन मिरवणुकीत महापालिका आयुक्त विद्या गायकवाड देखील फेटा घालून ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत सर्वांचा उत्साह वाढवतांना दिसून येत आहेत. गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत तसेच जागोजागी स्वागत कक्ष देखील उभारण्यात आले आहेत. यामुळे शहरात भक्तीमय व उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

मिरवणूक नेहरू चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, चौबे शाळा चौक, दधिच चौक, रथ चौक, सुभाष चोक पांडे डेअरी चौक मार्गे जाऊन मेहरुण तलाव येथे बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. मेहरुण तलावावर गणेश घाट व सेंट तेरेसा शाळेकडील काठ अशा दोन ठिकाणी गणेश विसर्जन केले जाणार आहे. यासाठी ९ तराफे, ४ क्रेन व ३ बोट सह पट्टीचे पोहणारे १५ तरुणही सज्ज ठेवण्यात आले आहेत. यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत ७० मंडळे सहभागी असतील.

विविध भागांतून ढोल-ताशे, लेझीम तसेच विविध साहसी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करणारे पथकांचा देखील विसर्जन मिरवणूकीत समावेश आहे. मिरवणुकीत विविध विषयांवर सामाजिक, धार्मिक संदेश देणारे देखावे मंडळातर्फे सादर केले जाणार आहेत. याची तयारी सुरु करण्यात आली आहे. मिरवणुकीत महिला वर्गाचा मोठा उत्साह दिसून येत आहे.