जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात प्लास्टिक बंदीच्या आदेशानंतरही प्रतिबंधित प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी थेट रस्त्यावर उतरून धडक कारवाई केली. अचानक करण्यात आलेल्या या तपासणी मोहिमेमुळे बाजारपेठ परिसरातील व्यापारी आणि फेरीवाल्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

महापौरांनी यापूर्वीच प्लास्टिक बंदीबाबत कठोर निर्देश दिले होते. मात्र शहरातील अनेक भागांत अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानंतर मंगळवारी राजकमल टॉकीज परिसर, तिजोरी गल्ली, अशोक टॉकीज गल्ली, दाणा बाजार, नेताजी सुभाषचंद्र चौक आणि फुले मार्केट परिसरात अचानक तपासणी करण्यात आली.

महापौर स्वतः तपासणीसाठी आल्याचे पाहताच फळ विक्रेते, भाजी विक्रेते, छोटे-मोठे दुकानदार आणि हॉकर्सची मोठी पळापळ झाली. अनेकांनी प्लास्टिक लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र मनपाच्या सतर्क पथकाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले.
तपासणीदरम्यान जवाहर क्लोथ स्टोअर्स आणि एच. आर. ट्रेडर्स या दुकानांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आल्याने दोन्ही दुकानांवर प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. एकूण २० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढे दुकानात किंवा हातगाड्यावर प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आढळल्यास संबंधित दुकान थेट सील करण्यात येईल, असा कडक इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे. ही कारवाई नगरसेवक रमेश मतानी, आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील, रुपेश भालेराव, स्वच्छता निरीक्षक महेश ठाकूर आणि मयूर सपकाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.










