जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गरपीटसह पावसाची जोरदार बॅटिंग : आज काय आहे हवामान खात्याचा अंदाज?
जळगाव लाईव्ह न्यूज | 27 नोव्हेंबर | एकीकडे थंडीची चाहूल लागली असताना राज्यात अवकाळी पावसाने एन्ट्री मारली आहे. रविवारी जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गरपीट, वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्याच्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्यात सोमवार आणि मंगळवारी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज राज्यातील परभणी, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
हिवाळी मोसमी वारे व चक्रीय वाऱ्यांच्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत रविवारी अवकाळी पाऊस झाला. गारपीट आणि वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला.
जळगाव जिल्ह्याला देखील काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. विजांच्या कडकडाटासह रात्री अनेक ठिकाणी पाऊस झाला. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात गरपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, चोपडा तालुक्यातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
या पावसामुळे कांदा, कापूससह तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुरीचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत असल्याने पावसामुळे फुलगळ होणार आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तर इतर फळं आणि भाजीपाला पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहणार असून आज देखील जळगाव जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.