दुर्दैवी! लेकीच्या भेटीला निघालेल्या पित्याला ट्रकने चिरडलं

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२३ । जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशातच अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आलीय. लहान मुलीला भेटण्यासाठी मोठ्या मुलीला सोबत घेऊन निघालेल्या दुचाकीस्वार बापाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ घडलीय. राजू दीपक कोळी (वय-४५, रा. चारठाणा, ता. मुक्ताईनगर) असं मृत व्यक्तीचं नाव असून लहान मुलीची भेट कायमचीच अधुरी राहिली आहे. दरम्यान, याबाबत या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

याबाबत अधिक असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे राजू कोळी हे कुटुंबासह वास्तव्याला असून ते शेतीकाम करून आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान भडगाव येथील लहान मुलीला भेटण्यासाठी राजू कोळी हे शनिवारी दुचाकीने जळगावहून निघाले. जळगाव-पाचोरा रस्त्यावर जात असताना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास रामदेववाडीजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार राजू कोळी यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेली मोठी मुलगी सोनी कोळी ही गंभीर जखमी झाली. तिच्या पायाला दुखापत झाली आहे.

अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी स्वप्निल पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात हलवला. तसंच जखमी मुलीला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राजू कोळी यांची आणि त्यांच्या लहान मुलीची भेट कायमचीच अधुरी राहिली आहे.