उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल; पालकमंत्री गुलाबराव पाटील

जानेवारी 23, 2026 5:51 PM

पालकमंत्री यांच्या हस्ते महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन-२०२६ उद्घाटन

udyog GP

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२६ । जळगाव जिल्ह्यात नवनवीन छोटे मोठे उद्योग यावेत तसेच युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील असून उद्योजक समाधानी तर जिल्हा समाधानी याप्रमाणेच जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.जिल्हा उद्योग केंद्र जळगाव यांच्या वतीने आयोजित शासनामार्फत केंद्र सरकारच्या “जिल्हा जळगाव हे निर्यात केंद्र” (District as Export Hub) या कार्यशाळेचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

Advertisements

या कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, उद्योग संचालक श्रीमती वृषाली सोनी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी आदी उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जिल्ह्यालाऔद्योगिक क्षेत्रामध्ये आता डी प्लस क्षेत्राचा दर्जा मिळाला असल्यामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग आले येतील राज्याच्या औद्योगिक धोरणामुळे जळगावला एक चांगली संधी मिळाली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, हा दर्जा जिल्ह्याला मिळण्यासाठी सर्व उद्योजक आमच्या सोबत होते, उद्योजकांना जी मदत लागत होती ती आम्ही केली डी प्लस दर्जा मिळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माझ्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यामुळे हा दर्जा मिळाला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भरपूर मदत केली.

Advertisements

औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना नवीन उद्योग उभारण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे, येणाऱ्या काळात छोटे छोटे नवीन उद्योग या ठिकाणी घ्यावेत यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू. जिल्ह्यातील केळी उद्योगाला चालना मिळावी यासाठी अंगणवाड्यांच्या पोषण आहारात केळीचा समावेश करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दर तीन महिन्यांनी उद्योजक व लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक लावण्यात यावी, अशी सूचना त्यांनी संबंधित विभागाला केली. आज या कार्यक्रमात, उद्योजकांनी सन्मानपत्र देऊन माझा जो सन्मान केला आहे ही माझ्यासाठी सर्वात मोठी भेट असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

जिल्ह्यात नवीन उद्योगासाठी प्रयत्न करणार – खासदार स्मिता वाघ
खासदार स्मिता वाघ आपल्या मनोगतात म्हणाल्या, उद्योजकांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय नवीन उद्योग पुढे जाऊ शकत नाही, जिल्ह्यात छोटे-मोठे उद्योग येणे गरजेचे तर आहेच परंतु छोटे उद्योग सुद्धा जीवंत राहिले पाहिजे त्यांच्या अडचणी सोडविल्या गेल्या पाहिजेत त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जळगावमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून जळगाव विमानतळाला कार्गो सुरू झाले पाहिजे, विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

जळगावातील उद्योजकांच्या अडचणी समजून विविध प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार – आमदार राजूमामा भोळे

New Project 2 1


आमदार सुरेश भोळे यावेळी म्हणाले, जळगाव शहरातील उद्योजकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे आवश्यक आहे तसेच विविध प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, जळगाव औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने अद्यावत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तसेच जिल्ह्यात विविध उद्योग आणण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले, उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी, प्रशासनातर्फे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत, बेरोजगार युवकांना नोकरी, नवीन व्यवसायाबाबत माहिती व्हावी यासाठी आगामी काळात जिल्हाधिकारी कार्यालयात एक माहिती कक्ष सुरू करत आहोत. या केंद्रामार्फत प्रशिक्षित युवकांना नोकरीची संधी कुठे कुठे उपलब्ध असेल,व्यवसाय करणाऱ्या युवकांसाठी नवीन व्यवसाय बाबतची माहिती या केंद्रमार्फत दिली जाणार आहे असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात उद्योग सहसंचालक श्रीमती सोनी म्हणाल्या, औद्योगिक उत्पादनाच्या निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करणे तसेच निर्यातवाढीसाठी जिल्ह्यांना अधिक सक्षम व उत्तरदायी बनविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासनाच्या “जिल्हा जळगाव हे निर्यात केंद्र” (District as Export Hub) या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात सुरुवातीला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत बँकेने मंजूर केलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत तीन स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत एक अशा चार मालवाहू ई-रिक्षाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now