⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | Jalgaon Live Impact : धरणगावच्या खुलेआम सट्टापेढ्या बंद, छुपे धंदे मात्र सुरूच!

Jalgaon Live Impact : धरणगावच्या खुलेआम सट्टापेढ्या बंद, छुपे धंदे मात्र सुरूच!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मागे आणि छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात ठिकठिकाणी टपऱ्यांवर खुलेआमपणे सट्टा घेतला जात असल्याचे वृत्त ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ने  (Jalgaon Live News) प्रकाशित केले होते. जळगाव लाईव्हच्या वृत्तानंतर धरणगाव पोलीस कामाला लागले खरे पण फक्त खुलेआम चालणारा सट्टा, जुगार बंद झाला. छुप्या पद्धतीने जुगार अद्याप सुरूच आहे. तसेच धरणगावात वृत्तानंतर गुटख्याचे दर देखील वधारले असून वाळूमाफियांमध्ये धास्ती भरली गेली आहे.

जळगाव जिल्हा आणि जागोजागी सुरु असलेल्या सट्टापेढ्या आता काही नवीन राहिलेले नाही. जळगाव शहरातील सट्टापेढ्यांची काही महिन्यांपूर्वी पोलखोल केल्यानंतर सर्वत्र शांतता होती. स्वतः पोलीस अधिक्षकांनी (SP Jalgaon) आंखोदेखी केल्यामुळे कारवाई करणे पोलिसांना भाग होते. जळगाव शहरात सट्टा, जुगार बंद झाला तरी ग्रामीण भागात मात्र सर्व कुशल मंगल होते. जळगावात तर सटोड्यांनी राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याचा ठेकाच घेतला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जुगाराचा अड्डा पुन्हा एकदा सुरु झाला आहे. दुसरीकडे माजी पालकमंत्री आ.गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा बालेकिल्ला असलेल्या धरणगाव शहरात तर पोलीसदादांच्या आशिर्वादाने अवैध धंदे चालकांची चांगलीच चंगळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे आणि व्यापारी संकुलात जागोजागी टपऱ्यांवर बिनधास्तपणे सट्टा घेतला जातो,असे वृत्त जळगाव लाईव्ह न्यूजने प्रसिद्ध केले होते.

जळगाव जिल्ह्यातील सट्टा, जुगाराचा दररोजची उलाढाल लाखो किंबहुना करोडोत असू शकते. लहानात लहान सट्टापेढीवर देखील दररोज हजारोंची उलाढाल होत असते. सट्टापेढीवर अनेकांचे घर चालते हे खरे असले तरी सट्टा, जुगाराच्या नादी लागून कुटुंब उध्वस्त झालेले देखील अनेक आहेत. कोणताही अवैध धंदा पोलीस आणि प्रशासनाच्या सहकार्याशिवाय चालणे शक्यच नाही. दोन दिवसापूर्वीच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेंदालाल मील परिसरात गल्लोगल्ली अवैध दारू विक्री होत असल्याचा आरोप करीत महिलांनी सहाय्यक अधिक्षकांना घेराव घातला होता. शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या दारू विक्री केली जाते. अनेक ठिकाणी तर गावठी हातभट्टीची दारू तयार देखील केली जाते. जळगाव शहराला तर अवैध धंद्यांचे माहेरघरच म्हणावे लागेल.
हे देखील वाचा : शौक बडी चीज हैं.. अवैध सावकारी बोकाळली, सावकार तुपाशी तर गरजू उपाशी

दारूशिवाय सट्टा, जुगार कसा बिनधास्त सुरु आहे याची पोलखोलच काही महिन्यांपूर्वी ‘जळगाव लाईव्ह न्यूज’च्या (Jalgaon Live News) माध्यमातून करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे (IPS Pravin Mundhe) यांना सट्टा, जुगार अड्ड्यांची आंखोदेखील परिस्थिती दाखविल्यावर ते देखील आश्चर्यचकीत झाले होते. शहरातील मेहरूण तलाव परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जुगार अड्डा सुरु असल्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP Jalgaon) देण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या निवेदनानंतर जळगाव लाईव्हने देखील वृत्त प्रकाशित केले होते. वृत्ताची दखल घेत पोलिसांनी कारवाई देखील केली. काही महिने जुगार अड्डा बंद न होता केवळ इतरत्र हलविण्यात आला होता. पावसाळ्याचे दिवस सुरु होताच जुगार अड्डा पुन्हा जैसे थे झाला आहे. जळगाव लाईव्हच्या वृत्तानुसार शहरातील सट्टा, जुगार अड्डे बंद झाले तरी जळगाव ग्रामीणला मात्र सुगीचे दिवस आले होते. जळगाव ग्रामीणला आजवर काहीच फरक पडलेला नाही. आजही जळगाव ग्रामीण भागात अवैध धंदे बिनधास्तपणे सुरु आहेत.
हे देखील वाचा : Jalgaon SP : ..जेव्हा पोलीस अधीक्षक संतापतात, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना घेतले फैलावर

राज्यात सत्तांतर होवो कि देशात राष्ट्रपती निवड होवो, स्थानिक पोलीस आणि इतर कलेक्शन करणाऱ्या पोलिसांच्या आशिर्वादाने सट्टा, जुगार अड्डे बिनधास्त सुरु होते. धरणगाव आजवर शिवसेना, (Shivsena) माजी पालकमंत्री आ.गुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ (Gulabrao Wagh) यांचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या मागे आणि छत्रपतींच्या नावे असलेल्या व्यापारी संकुलात सट्टापेढ्यांचा (Gambling) बाजार मांडण्यात आला आहे. पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या परिसरात जागोजागी पानटपरीवर बिनधास्तपणे सट्टा घेतला जात आहे. अवघ्या ३०० मीटर अंतरात किमान ८ ठिकाणी सट्टा घेतला जातो. तीन ठिकाणी तर केवळ सट्ट्याचे आकडे घेण्यासाठी स्वतंत्र टपरी थाटण्यात आली आहे. जळगाव लाईव्ह न्यूजने याबाबत स्टिंग ऑपरेशन करीत पोलिसांसह सट्टापेढी कॅमेऱ्यात कैद केल्या होत्या.

जळगाव लाईव्हने साहेब तुम्ही पण.. छत्रपतींच्या पुतळ्यामागे टपरी-टपरीवर पोलिसांसमोर घेतला जातो खुलेआम सट्टा! अशा मथळ्याखाली संपूर्ण आंखोदेखी परिस्थिती मांडली होती. धरणगाव पोलिसांनी वृत्ताची गंभीर दखल घेतल्याने खुलेआम सुरु असलेला सट्टा, जुगार बंद झाला आहे. छत्रपतींच्या नावाची इभ्रत पोलिसांनी काही दिवस का असेना जपली आहे मात्र पुढे काय होणार आणि धंदे किती दिवस बंद असणार हे सांगणे अशक्य आहे. खुलेआम सट्टा बंद झाला असला तरी छुप्या पद्धतीने मात्र सुरूच आहे. मोठे राजकीय पाठबळ असल्याने त्या सट्टा घेणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. धरणगाव तालुक्यातील लाखोंचा पैसा सट्टा घेणाऱ्या बुकींच्या खिशात जात आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.