जळगाव शहरात अवजड वाहनांसाठी नवीन नियमावली जारी; असे आहेत बदल आणि वेळ
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२४ । गेल्या मागील काही काळात जळगाव शहरात अपघाताच्या घटना मोठ्या वाढल्या आहेत. यातच शहरात वाहनांच्या रहदारीमध्ये झालेल्या वाढ आणि छत्रपती शिवाजी नगर उड्डाणपुलावर झालेल्या अपघातानंतर, पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अवजड वाहनांसाठी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार, आकाशवाणी चौक ते टॉवर चौकादरम्यान अवजड वाहनांसाठी विशिष्ट वेळा निर्धारित करण्यात आल्या आहेत.
जळगाव शहरातील वाहनांची नोंदणी मोठ्या प्रमाणात वाढत असून, यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यातच शहरात अपघाताच्या घटना देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, आकाशवाणी चौक ते रेल्वे स्टेशन पावेतो जाणारा मार्ग सर्वात जास्त रहदारीचा असून, या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मुख्य बाजारपेठ, सरकारी व खाजगी दवाखाने आणि बँका यांसारखी महत्वाची स्थळे आहेत.
नागरिकांना रेल्वे स्टेशन व बस स्टॅन्डकडे जाण्यासाठी नेहरू चौक ते रेल्वे स्टेशन हा मुख्य मार्ग उपलब्ध असून, येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक व वाहनधारक यांची सुरक्षितता आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न या सर्व बाबींचा विचार करून पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे मार्गात बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
नवीन नियमावली आणि वेळ
आकाशवाणी चौक ते रेल्वे स्टेशन पावेतो जाणारे सर्व रस्ते व रेल्वे स्टेशन-टॉवर चौक – नेरी-नाका चौक, अजिंठा चौक तसेच नेरी-नाका ते स्वातंत्र्य चौक पावेतो जाणारे रस्त्यांवर, जाण्यास व येण्यास, सर्व प्रकारच्या खाजगी / लक्झरी बसेस व अवजड वाहनांना (राज्य परिवहन मंडळ बसेस वगळून) प्रवेश बंदी करण्यात येत आहे. अवजड वाहने (मालवाहतूक करणारी) शहरात अजिंठा चौक-नेरी नाका-टॉवर चौक-शिवाजीनगर उड्डाणपूल या मार्गाने सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीतच मालवाहतूक करता येणार आहे.
हरकती आणि सूचना
ही अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्यापर्यंत उक्त मसुद्यासंबंधी कोणत्याही व्यक्ती/ संस्थेकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना असतील त्यांनी त्या सूचना मुदत संपण्यापूर्वी सादर केल्यास त्यावर पोलीस अधीक्षक, जळगाव विचार करतील.