जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२४ । राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असला तरी काही ठिकाणी उष्णतेचे वातावरण आहे. दरम्यान, हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यात आगामी चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज म्हणजेच दि. १६ ते २३ मे दरम्यान जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ अंशाच्याच पुढे राहण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात संमिश्र वातावरण पाहायला मिळाले. चार पाच दिवसापूर्वी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. १५ मे दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार काही तालुक्यांमध्ये पावसाने हजेरीदेखील लावली. मात्र, आता वातावरण काही दिवस कोरडे राहण्याची शक्यता आहे.
यामुळे पारा वाढणार आहे. मात्र, त्यासोबतच उन्हाळी वारे वाहत असल्याने उन्हाची दाहकता अधिक जाणवणार आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच जिल्ह्यात २० ते २५ किमी वेगाने वारे वाहणार आहेत.