जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२५ । इस्रायल-इराण युद्धबंदीच्या घोषणेनंतर १ लाखांच्या खाली घसरलेल्या सोन्यात दरात पुन्हा मोठी वाढ झालीय. सोबतच चांदीचा दर देखील वधारला आहे. जळगावच्या सुवर्णबाजारात १ जुलै रोजी सोन्याचा दर प्रति तोळा १४०० रुपयांहून अधिकने वाढला तर चांदी दरात एक हजार रुपयांची वाढ झाली. सोने चांदी दरात वाढ झाल्याने खरेदीदारांना आणखी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

मंगळवारी जळगाव सराफ बाजारात सोने दरात १४४२ रुपयाची वाढ झाली. यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९७६०० ( जीएसटीसह १,००,५२८) गेले आहेत, तर चांदी १ हजाराने वाढून १,१०, २१० रुपये किलो झाली आहे. या दरवाढीमागे ट्रम्प सरकारने टेरिफ धोरणाबाबत पुन्हा चर्चा सुरू केल्याचे कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

गेल्या आठवड्याच्या गुरुवारी, २६ जून रोजी १,००,४२५ रुपये तोळा असलेले सोने शुक्रवारी १३३९ नी स्वस्त होऊन ९९,०८६ रुपयांवर आले. त्यानंतर ३० जूनपर्यंत ९९,०८६ च्या दरावर स्थिरावले होते. १ जुलै, मंगळवारी १, ४४२ रुपयांनी वाढ होऊन ते १,००,५२८ रुपयांवर गेले आहे. तसेच २७ जूनपासून १,०९,१८० रुपये असलेली चांदी १ जुलैला १,१०,२१० रुपये किलोवर पोहोचली.







