जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२६ । आंतरराष्ट्रीय पातळीवरील एका मोठ्या घडामोडीचा थेट परिणाम आता जळगावच्या सुवर्ण नगरीवर पाहायला मिळाला आहे. ‘इराण आणि अमेरिका’ यांच्यात शांतता करार होताच जागतिक बाजारासह देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे सोन्या-चांदीची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज बाजारात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे तब्बल १ हजार ४०० रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. दरकपातीनंतर जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ५३ हजार ५८ रुपयांवर आला आहे. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून चांदी प्रति किलोमागे तब्बल ३ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. यांनतर जीएसटीसह एक किलो चांदीचा दर २ लाख ५४ हजार ४१० रुपयांवर स्थिरावला आहे.

एकाच दिवसात झालेली ही घसरण मोठी मानली जात असून, ग्राहकांसाठी दागिने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ असल्याची भावना सुवर्ण व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. सराफ व्यावसायिकांच्या मते, जागतिक घडामोडी, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांचा बदलता कल यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठे बदल होत आहेत. दर घसरल्याने आगामी लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारातील खरेदीला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी दिवसात भाव आणखी कमी होतात की पुन्हा वाढतात याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागून आहे.










