जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२५ । सोने खरेदीचा प्लॅन करणाऱ्या खरेदीदारांचे हौश उडणार आहे. रशिया-युक्रेनमधील तणावामुळे मागच्या काही दिवसापासून दोन्ही धातूंमध्ये वाढ होताना दिसत आहे. यातच काल गुरुवारी जळगावच्या सुवर्णनगरीत दिवसभरात चांदी दरात तब्बल ४००० रुपयांची वाढ झाली तर सोनेही ९०० रुपयांनी महाग झाले.

जळगाव सराफा बाजारात गुरुवारी, ५ जूनला झालेल्या दरवाढीनंतर चांदीने १,०८,१५० रुपये किलोचा टप्पा गाठून आजपर्यंतचा उच्चांक गाठला तर सोने एकाच दिवसात ९०० रुपयांनी वाढून लाखांवर (१,०१,१४६ रुपये प्रति तोळा) पोहोचले आहे. चार दिवसांपासून सोने लखपती आहे.
यापूर्वी बुधवारी सोने १००२१९ रुपये तर चांदी १०४०३० रुपये किलो होती. भू-राजकीय तणाव, निराशाजनक अमेरिकन डेटामुळे डॉलर कमकुवत झाला आणि चांदीच्या किमती ३० ऑक्टोबर २०२४ नंतर गुरुवारी विक्रमी स्तरावर गेल्या. गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी चांदी १०३००० रुपये किलोच्या उच्चांकावर होती. सोन्याने याआधीच २२ एप्रिल २०२५ रोजी १०१९७० रुपये तोळ्याचा विक्रमी दर गाठला आहे.
यंदा १ जानेवारीपासून आतापर्यंत, चांदीची किंमत ९०६४० रुपये प्रतिकिलोवरून १७५१० रुपयांनी वाढून १०८१५० रुपये झाली आहे. तर २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ७९२०७ रुपयांवरून २१९३९ रुपयांनी वाढून १०११४६ रुपये झाली आहे.