जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२४ । देशात सध्या सणासुदीचे दिवस सुरु असून येत्या १० दिवसात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकजण सोने-चांदी खरेदी करतात. मात्र त्यापूर्वीच सोन्याच्या किमतीने नवीन विक्रमी उच्चांक गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे डोळे पांढरे झाले. जर तुम्हीही सणासुदीला सोने-चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आजचे दर तपासून घ्या
जळगाव सराफा बाजारात दोन्ही सोन्यासह चांदीच्या किमतींनी चांगलीच आघाडी घेतली. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना सोन्याच्या दरात काहीच घसरण पाहायला मिळत नाही. सणासुदीसोबतच आता लग्नाचा सीझन येणार असल्याने सराफा बाजारात दिवसागणीक सोन्याच्या किंमती नवनवीन उच्चांकच गाठणार आहे.
सध्या २२ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७२,६८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७७,१०० रुपये प्रति तोळा इतका आहे. जीएसटीसह सोन्याचा दर ७९,२२० रुपये इतका आहे. तर दुसरीकडे १ किलो चांदीची किंमत ही आज ९३००० रुपये इतकी आहे.दरम्यान, सोने लवकरच ८०,००० रुपयांच्या घरात तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याचं कारण काय?
देशभरात सोन्याच्या किंमती अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची स्थिती आणि करन्सी एक्स्चेंज रेटचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यास भारतीय बाजारावर याचा परिणाम होतो. तसच सण-उत्सवांच्या काळात वाढत्या मागणीमुळेही सोन्याच्या दरात चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळतं.