जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२५ । गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धातूंचे दर घसरताना दिसत आहे. जळगाव सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात मोठी घसरण झाली आहे. सोबतच चांदी देखील गडगडली आहे. सोनं-चांदीच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जळगाव सराफ बाजारात सोमवारी २०६ रूपयांची घसरण नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २६ हजार ६९० रूपयांपर्यंत खाली आले होते. मात्र आज दुसऱ्या दिवशी सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा प्रति १० ग्रॅम १४४२ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २५ हजार २४८ रूपयांपर्यंत खाली आले. सोन्यात पाच दिवसांत प्रति १० ग्रॅम तब्बल ५३५६ रूपयांची घट झाल्याचे दिसून आले.

दुसरीकडे आज चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. जळगाव सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी दिवसभरात २०६० रूपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ६२ हजार ७४० रूपयांपर्यंत खाली आले होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा ३०९० रूपयांची घट नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह एक लाख ५९ हजार ६५० रूपयांपर्यंत घसरले. चांदीत पाच दिवसांत प्रति किलो तब्बल १० हजार ३०० रूपयांची घट झाल्याचे दिसून आले.







