⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

धक्कादायक :जळगावात कडाक्याच्या थंडीने घेतला चौघांचा बळी

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । गेल्या काही दिवसापासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. दोन-तीन दिवसापूर्वी जळगावात सार्वधिक कमी तापमानाची नोंद झाली होती. दरम्यान, जळगाव शहरात कडाक्याच्या थंडीमुळे रस्त्याच्या कडेला झोपलेल्या चार जणांचा बळी गेला आहे. मृत चौघेही निराधार आणि बेघर आहेत. ही घटना सोमवारी घडली आहे. रात्रीच्या सुमारास सुटलेले थंडगार वारे आणि अतिथंडीमुळे गारठून चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

साेमवारी मध्यरात्री दोन वाजेनंतर थंडीचा कडाका प्रचंड वाढला होता. तापमापकावर ७.५ अंशांची नोंद झाली असली तरी रात्री कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांनी ही थंडी असह्य होत होती, असे सांगितले. अशात जमीन थंड व अंगावर पुरेसे पांघरूण नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला उघड्यावर झाेपलेले हे चौघे मरण पावले असावे, असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट होईल.

जळगाव शहरात भीक मागून उदरनिर्वाह करणारे हे चौघे वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळून आले. त्यातील एक पांडे डेअरी चौकात, एक निमखेडी रस्त्यावर तर एक रेल्वेस्थानक परिसरात आढळून आला. एकाचा मृतदेह सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला. जिल्हा रुग्णालयात आणल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांची ओळख पटलेली नाही.

दरम्यान, जिल्ह्यात तीन दिवस उन्हाचा चटका वाढणार असून, शुक्रवारी तापमान अचानक कमी हाेण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात माेठी घसरण हाेऊन ‘काेल्ड डे’ची स्थिती निर्माण शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. शुक्रवारी तापमानाची पातळी आणखी घसरणार असून, लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.

हे देखील वाचा :