जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असून इथली केळी विदेशात देखील निर्यात केली जात आहे. दरवर्षी कितीतरी रेल्वे वॅगन्स भरून केळी इतर ठिकाणी पाठविण्यात येते. काही वर्षांपूर्वी पॅकींग केलेल्या एखाद्या ब्रँडचे वेफर्स खाण्याची जळगावकरांनाच काय देशभरात सवय होती. अलीकडच्या काळात ठिकठिकाणी थेट ताजे गरमागरम वेफर्स तयार करून दिलेले स्टॉल थाटण्यात आले आहे. ग्राहकांना विशेषतः खवैय्यांना केव्हाही कधीही जिभेचे चोचले पूर्ण करायला केळीचे वेफर्स सहज उपलब्ध होतात. केळी वेफर्स ताजे आणि पौष्टिक असल्याने देखील त्यांना प्राधान्य दिले जाते. अगोदर केवळ जळगाव जिल्ह्यात मिळणारे कच्च्या केळीचे ताजे वेफर्स आता राज्यभरात मिळू लागले असून घरगुती गृहोद्योग म्हणून या व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे.
वेफर्स म्हटले म्हणजे पहिला प्रकार डोळ्यांसमोर येतो तो बटाटा वेफर्स (बटाटा चिप्स). देशभरातील नामांकित खाद्य उत्पादक कंपन्या बटाटे वेफर्सची निर्मिती करून देशभरात पोहचवीत होते. अनेक ठिकाणी घरीच वेफर्स तयार केले जात असल्याने उपवासाला घरातीलच वेफर्सला प्राधान्य दिले जाते. घराबाहेर फिरताना, गावी जाताना, सिनेमागृहात, मित्रांसोबत टाईमपास करताना खाल्ला जाणारा स्वस्त आणि मस्त पदार्थ म्हणजे वेफर्स. जळगाव जिल्ह्यात बटाटे वेफर्ससोबतच केळी वेफर्स देखील प्रसिद्ध आहे. अगोदर कच्ची केळी गोलाकार आकारात कापून त्याचे वेफर्स घरीच केले जात होते. केळी वेफर्सची मागणी वाढल्याने नामांकित कंपन्यांनी देखील ते उत्पादन बाजारात आणले. साधे आणि तिखट असे दोन प्रकार केळी वेफरचे बाजारात उपलब्ध असतात.
जळगाव जिल्ह्यासह देशभरात अनेक ठिकाणी लघुउद्योग आणि गृहोद्योगकडून साध्या पॅकींगमध्ये स्वस्तात मस्त बटाटा वेफर्स बाजारात विक्रीसाठी आणले. ब्रँडेडसोबतच या उत्पादनाला देखील मागणी वाढली, अनेकांना रोजगार मिळाला. जळगावात काही वर्षापासून थेट शेतातून कच्ची केळी घ्यायची आणि त्याच ठिकाणी मातीची भट्टी उभारून रस्त्याच्या कडेला ताजे आणि लांबट आकाराचे वेफर्स तयार करून देण्याचा व्यवसाय अनेकांनी थाटला. साधे आणि तिखट अशा दोन प्रकारात केळी वेफर्स मिळू लागले. बघता बघता केळी वेफर्सची मागणी चांगली वाढली. अनेकांनी या लहानश्या व्यवसायाला भव्य रूप दिले. केळी वेफर्समध्ये पुदिना, लोणचे, मसाला असे विविध फ्लेवर आणले. दुकाने थाटून त्याची विक्री करण्यात येऊ लागली.
एका सर्व्हेनुसार साधारणतः १०० ग्राम केळी वेफर्समध्ये ५१९ कॅलरी, ३४ ग्राम फॅट, स्टुरेटेड फॅट २९ ग्राम, कोलेस्ट्रॉल ० टक्के, सोडियम ६ मिलीग्रॅम, पोटॅशियम ५३६ मिलिग्रॅम, कार्बोहायड्रेट १९ टक्के, डायटेरी फायबर ३२ टक्के, साखर ३५ ग्राम, प्रोटीन ४ टक्के, व्हिटॅमिन सी १० टक्के, कॅल्शियम १ टक्का, लोह ७ टक्के, व्हिटॅमिन ब६ १५ टक्के, मॅग्नेशियम १९ टक्के असते. केळी शरीरासाठी पौष्टिक मानली जातात. वजन वाढण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. केळीच्या वेफर्समध्ये देखील अनेक फायदेशीर घटक असून त्यामुळे देखील शरीरातील ठराविक घटकांची कमतरता भरून निघणार आहे.
घरच्या घरी केळी वेफर्स करण्याची रेसिपी देखील सोपी आहे. केळी वेफर्स तयार करण्यासाठी कच्ची केळी, शेंगदाण्याचं तेल, सैंधव मीठ, मीठ या साहित्याची आवश्यकता असते. सर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात सैंधव मीठ किंवा साधे मीठ घालून त्यात केळी पंधरा मिनिटांसाठी भिजवून ठेवा. नंतर त्यातून केळी काढून चिप्सच्या आकारात कापून स्वच्छ कपड्यावर दहा मिनिटांसाठी पसरवून ठेवा. असे केल्याने केळी काळी पडत नाही आणि मीठ देखील काहीसे त्यात मुरते. दहा मिनिटांनी कढईत तेल गरम करुन चिप्स टाकून सोनेरी होयपर्यंत तळून घ्या. जरा गार झाल्यावर वरुन मीठ आणि आवडीप्रमाणे इतर मसाले घालून स्वाद घ्या. हे वेफर्स एअरटाइट डब्ब्यात ठेवल्यास पुष्कळ दिवस चांगले राहतात.
केळी वेफर्स तयार करण्याच्या व्यवसायात आपण करिअर करू इच्छित असाल आणि जास्त मेहनत घेण्याची इच्छा नसेल तर आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील उपयोग करून घेता येईल. इंडिया मार्ट, फ्राय मशीन, ट्रेड इंडिया सारख्या वेबसाईटवर केळी वेफर्स तयार करण्याचे मशीन साधारणतः ३० हजारांपासून पुढे लाखो रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. क्षमता आणि इतर फीचर्स वाढल्याने मशीनचे दर देखील वाढत जातात. योग्य नियोजन केल्यास केवळ केळी वेफर्स विक्री करून देखील तुम्ही वर्षाकाठी लाखो रुपये कमावू शकतात.