हॅलो..मी ईडी ऑफिसमधून बोलतोय, म्हणत जळगावच्या डॉक्टरला 19 लाखांत गंडविले
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२४ । सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असून अशातच जळगावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका डॉक्टरला, ‘मी ईडी ऑफिसमधून बोलतोय, मनी लॉड्रींगमध्ये तुमचे बँक खाते आलेय’, अशी बतावणी करून ईडीच्या जाचातून वाचायचे असल्यास पैसे पाठवा, असे सांगून जळगावच्या पॅथॉलॉजी चालक डॉक्टरांची १९ लाख २० हजार रुपयांत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.ही फसवणूक १ ते १८ मेदरम्यान झाली आहे
याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. शहरात पॅथॉलॉजी लॅब चालवणाऱ्या डॉक्टरला १ मे रोजी अंकुश वर्मा याचा ९२०५७१६८६८ या मोबाइलवरून कॉल व व्हॉट्सअॅप क्र. ९८६४६१८२३८ वरून एसआय सुनीलकुमार मिश्रा याने व्हॉट्सअॅप चॅट व व्हिडिओ कॉल केले.
‘आम्ही ईडीच्या ऑफिसमधून बोलतोय. मनी लॉड्रींगमध्ये तुमचे बँक खाते आले आहे. त्यात तुमचा सहभाग आहे, असे दिसतेय. त्यातून बाहेर पडायचे असेल, तर आम्ही सांगू तसे वागा’, असे त्या व्यक्तींनी डॉक्टरांना सांगितले. संशयितांनी त्यांचे बँक खात्याचा क्रमांक पाठवून त्यात पैसे टाकण्यास सांगितले. यामुळे घाबरलेल्या डॉक्टरांनी वेळोवेळी १ ते १८ मेपर्यंत १९ लाख २० हजार रुपये जमा केले.
मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टरांनी ऑनलाईन तक्रार नोंदविली. त्यानंतर मंगळवारी (ता. २१) त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयित उत्तर भारतातील असण्याची शक्यता आहे. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम तपास करीत आहेत.
नकली आदेशांच्या प्रती
या सायबर गुन्हेगारांनी ईन्फोर्समेंट डायरक्टोरेटच्या डिजींचे लेटर हेड, न्यायदंडाधिकार्यांच्या सहि शिक्कयाची अटक होण्याची नोटीस, उत्तरप्रदेश शासनाची राजमुद्रा वॉरमार्क असलेल्या दस्तऐवज पाठवुन डॉक्टरांना मिती घालून त्यांच्याकडून एकोणीस लाख रुपयांचा गंडा घातला आहे.