⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव जिल्ह्याची पर्यटन वारी, जळगाव लाईव्ह देणार माहिती भारी

जळगाव जिल्ह्याची पर्यटन वारी, जळगाव लाईव्ह देणार माहिती भारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । आज जगभरात पर्यटन दिवस साजरा केला जात आहे. जळगाव जिल्ह्यात काहीच नाही म्हणून बरेच जण ओरडत असतात पण आम्ही पर्यटन दिवसाचे औचित्य साधून जळगाव लाईव्हच्या माध्यमातून जळगावातील पर्यटन स्थळे आणि प्रेक्षणीय व ऐतिहासिक स्थळे आपल्यासमोर आणणार आहोत. आमच्या संपूर्ण मालिकेसाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाची मोलाची साथ लाभत आहे.

जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून जळगाव जिल्ह्याचे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आलं होते. जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी आम्हाला हे पुस्तक उपलब्ध करून दिले आहे. कॉफी टेबल बुकच्या सदस्य समितीत तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिघावकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, गांधी रिसर्च फाउंडेशनचे भुजंग बोबडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील, प्राचार्य बी.एन.पाटील, संचालक एस.टी.इंगळे, कवी वा.ना.आंधळे, डॉ.एम.के.जाधव, ज्येष्ठ पत्रकार राजेश यावलकर, छायाचित्रकार तुषार मानकर, छायाचित्रकार सुमित देशमुख यांच्या मेहनतीने हे पुस्तक अस्तित्वात आले. याच पुस्तकाच्या आधार घेत जळगाव लाईव्ह पर्यटन विशेष मालिका सुरु करत आहे.

सातपुडा पर्वतरांगांतील पायथा जसा महाराष्ट्रातील खान्देशच्या प्रांताला स्पर्श करीत खाली उतरतो तसा तो वऱ्हाडी, खान्देशी, अहिराणी तसेच लेवा बोलीभाषांना घेऊन पुढे सरकत जातो. सातपुड्याने या परिसराला केवळ नैसर्गिक साधनसंपत्तीच नव्हे, तर एक वैभवशाली संस्कृतीही दिली आहे. अजिंठ्याच्या पायथ्यापासून थेट सह्याद्रीच्या डोंगरकाठाने गुजरातच्या टोकावर उभ्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्यापर्यंत, रेल्वेमार्गाने दिल्लीकडे जाताना भुसावळच्या पुढे पार बऱ्हाणपूरच्या काठापर्यंत खान्देश आपल्या वैभवी संस्कृतीने विणला गेला आहे. जळगाव जिल्ह्याचा दक्षिणोत्तर विस्तार २०° उत्तर अक्षांश ते २१° उत्तर अक्षांश तसेच पश्चिम-पूर्व विस्तार ७४°५५ पूर्व रेखांश ते ७६°२८ पूर्व रेखांश आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १२,१५५ चौ. कि. मी. आहे.

इथली भूमी आणि इथले संदर्भ थेट रामायण, महाभारतास जाऊन भिडतात. कधीकाळी महाकवी वाल्मीकी इथल्याच चाळीसगावजवळील वालझरी जंगलात वास्तव्यास होते तर महाभारत ज्यांनी लिहिले ते व्यास मुनी जळगाव जिल्ह्यातील यावल येथे काही काळ वास्तव्यास असल्याचे उल्लेख पौराणिक ग्रंथात आढळतात. एरवी कुठेही न आढळणारे व्यास मुनींचे प्राचीन मंदिर यावल येथे आजही आहे.

महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी हे याच जिल्ह्यातील फैजपूर, भडगाव व कनाशी या परिसरात असल्याच्या नोंदी महानुभाव पंथाच्या साहित्यात आढळतात. महानुभाव वाङ्मयात ‘श्री ऋद्धीपूर वर्णन’ या ग्रंथाला विशेष स्थान आहे. तो ग्रंथ लिहिणारे नारायण व्यास ऊर्फ बहाळिये हे चाळीसगावजवळील बहाळ गावचे. बाराव्या शतकात गणितासंदर्भात विविध महत्त्वाचे शोध लावून या विषयाला दिशा देणारे खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य हे देखील चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवीचे. ‘सिद्धांत शिरोमणी’ आणि ‘लीलावती’ हे अनमोल ग्रंथ त्यांनी येथेच रचले.

मुक्ताबाई इथल्याच मुक्ताईनगरच्या, महान हठयोगी चांगदेव हे देखील इथलेच. संत तुलसीदासांचे शिष्य जनजसवंत यांनी तापी नदीतीरावर समाधी घेतली. खान्देशी लोकगीतातील काव्यप्रकार असलेल्या ‘वया’ची रचना करणारे अवलिया चाँद सुलतान याच तापी नदीकाठच्या तांदळवाडीचे. ‘सिंहासन बत्तीशी’, ‘पाचोपाख्यान’ आणि ‘वेताळ’ सारखे अजरामर ग्रंथ देणारे महालिंगदास गिरणा नदीकाठच्या तिरीवाडी येथे राहत होते.

आधुनिक मराठी कवितेचे जनक कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत हे १८९७ ते १९०१ अशी चार वर्षे भडगाव येथील नगरपरिषदेच्या शाळेत शिक्षक होते. ‘बालकवी’ ठोमरे धरणगावचे. ‘औदुंबर,’ ‘श्रावणमास’ अशा कितीतरी सुंदर कविता त्यांनी रचल्या. दु. आ. तिवारी पहूरपुढच्या शेंदुर्णीचे. नवकाव्याचे जनक बा. सी. मर्ढेकर यांचा जन्म फैजपूरचा. साने गुरुजींची कर्मभूमी याच जिल्ह्यातील अमळनेरची. माधव जूलियन हेही अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात प्राध्यापक होते. ‘विरह तरंग’सारखे ‘अमर काव्य’ त्यांनी लिहिले. केशवसुतांच्या समकालीन असलेले श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हेही काही काळ जळगावला होते. काव्यरत्नावलीकार नानासाहेब फडणीस हे जळगावचेच. कवी कृष्णाजी केशव दामले यांना ‘केशवसुत’ हे नाव याच खान्देशमध्ये नानासाहेब फडणीस यांनी दिले, तर त्र्यंबक बापूजी ठोमरे यांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी शुद्ध, सुगम व रसाळ कविता ऐकविल्याने ‘बालकवी’ हे बिरुद १९०७ साली कर्नल कीर्तिकर यांनी दिले.

मराठी भावविश्वाचे एक लख्ख पान बहिणाबाईंच्या रूपाने खान्देशात अवतरले. उपजत असलेले ज्ञान व या ज्ञानाच्या जोडीला जे जे दृष्टिपथात येईल, त्यातील भावविश्वाला आपल्याच ‘लेवा गणबोली’ला ‘मराठी बोली भाषेत बोलते करण्याची अपूर्व क्षमता या मायमाऊलीने सिद्ध केली. जगण्याशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टीचा धांडोळा घेत शेतीपासून मातीपर्यंत, बियांपासून पानांपर्यंत, भक्तीपासून कष्टापर्यंत सारे विश्व बहिणाबाईंनी सरळ, साध्या, सोप्या भाषेत सर्वांपर्यंत पोहोचविले.

अहिराणी, लेवा मराठी, पावरा या प्रमुख बोलीभाषांचा हा जिल्हा अजिंठा, वेरूळ, पितळखोरे, खांडरागड, पांडवलेणी अशा लेणीसमूहांनी व अशिरगड, थाळनेर, दौलताबाद, साल्हेर-मुल्हेर अशा इतिहासप्रसिद्ध किल्ल्यांनी वेढलेला आहे.

 

थोडक्यात काय तर जळगाव जिल्हा हा पर्यटनासाठी एक उच्च प्रतीचा जिल्हा आहे.उद्या आम्ही तुम्हाला जळगाव शहरातील काही उच्च प्रतीच्या जागा दाखवणार आहेत. त्याठिकाणी तुम्ही जायलाच हवे.

 

थोडक्यात काय तर जळगावात देखील अनेक प्रेक्षणीय स्थळे असून ती आपल्या नजरेपासून सुटली आहेत. उद्या जळगाव शहरातील प्रमुख ठिकाण आणि त्यांची थोडक्यात माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.