जळगाव शहर

जळगाव जिल्ह्यास मिळणार १० ऑक्सीजन प्लांटसह रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा साठा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । एकीकडे राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असून प्रशासन याला हाताळण्यात अयशस्वी ठरले असतांना माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांनी आज मुंबई येथील उच्चस्तरीय बैठकीत जिल्ह्यासाठी पीएम केअर फंडातून तब्बल १० ऑक्सीजन निर्मिती प्लांटसह रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा मंजूर करून आणला आहे.

माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत प्रशासनाला वारंवार धोक्याचे इशारे दिले असतांनाही याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. याचमुळे आता राज्यातील स्थिती ही अतिशय चिंताजनक बनली असून जळगाव जिल्ह्यात देखील कोरोनाची स्थिती अतिशय विकोपाला गेलेली आहे. रूग्ण तडफत असतांना सत्ताधारी लोकप्रतिनिधी हाताची घडी, तोंडावर बोट या स्थितीत असतांना आ. गिरीशभाऊंनी  रूग्णांसाठी धाव घेतली आहे.

या अनुषंगाने आज मुंबई येथे आ. गिरीश महाजन यांनी अन्न व औषध प्रशासन खात्याचे आयुक्त परिमल राजीव यांच्यासोबत बैठक घेतली. याला माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी राज्यातील रूग्णांसाठी सिपला कंपनीतर्फे ३५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करण्यात आल्याची माहिती एफडीए आयुक्तांनी दिली. यातून जळगाव जिल्ह्यात वाढीव साठा मिळावा अशी मागणी आ. गिरीश महाजन यांनी केली.

यावर जळगाव जिल्ह्यास योग्य तो साठा मिळणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली. तर पीएम केअर फंडातून जळगाव जिल्ह्यासाठी १० ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना देखील मंजुरी प्रदान करण्यात आली. यामुळे जळगाव जिल्ह्यातील रूग्णांना पुरेसा प्राणवायू उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांसाठी लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी आ. गिरीश महाजन यांनी दिली. तर जळगाव जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचे रिपोर्ट लवकर येत नसून या प्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी देखील त्यांनी केली.

दरम्यान, आमदार गिरीश महाजन यांनी आजच्या बैठकीची माहिती देतांना जिल्हा प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विरोधी पण रूग्णसेवेसाठी थेट मैदानात उतरले असतांना सत्ताधारी पक्षाचे मंत्री व आमदार हे मात्र होम आयसोलेशनमध्ये बध्द झालेले आहेत. आम्ही मात्र न घाबरता थेट मैदानात असून सत्ताधार्‍यांनी आता तरी शुध्दीवर येऊन रूग्णसेवा करावी असा खोचक सल्लादेखील आ. गिरीशभाऊ यांनी दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button