जळगाव जिल्हा लवकरच अनलॉक होणार?
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात लागू केलेल्या निर्बंधामध्ये आणखी शिथिलता मिळावी अशी मागणी नागरिक, व्यापाऱ्यांकडून वारंवार होत आहे. जिल्ह्यातील कोरोनातील सकारात्मक रुग्णांची आकडेवारी गेल्या आठवडाभरात १० च्या आतच आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासनाला जिल्हा अनलॉक करण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र कोरोना बाबतचे नियम आणि निर्बंध काही शिथील होत नाही. नागरिकांना हे नियम शिथिल होण्याची आस लागली आहे. त्यातच जिल्ह्यातील नागरिकांना एक आनंदाची वार्ता मिळाली आहे. ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातील नियम शिथील करून जळगाव जिल्हा अनलॉक करावा असा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राज्य शासनाला दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जळगाव लाईव्हला दिली आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, दर आठवड्याला जिल्ह्याचा कोरोना बाबतचा प्रस्ताव हा राज्य शासनाला देण्यात येतो. गेल्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून आता जळगाव जिल्हा पूर्णपणे अनलॉक करण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राज्य शासनाला पाठवला आहे. याबाबत राज्य शासन लवकरच निर्णय घेणार आहे.